मालवण उपनगराध्यक्ष वराडकर, कुशे उपोषणावर ठाम
*💫मालवण दि.०७-:* मालवण नगरपालिकेच्या गैरकारभाराविरोधात नगरपालिकेच्या समोर उपोषणास बसलेल्या उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांची आज मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आज भेट घेतली. कोरोनाचे संकट वाढत असून निर्बंध लागू करण्यात आल्याने उपोषण मागे घ्यावे, प्रश्नांबाबत नगरपालिकेत बसून चर्चा करू, तसेच आपण हे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडू आणि त्यावर मार्ग काढू, असे यावेळी मुख्याधिकारी जिरगे यांनी वराडकर व कुशे यांना सांगितले. मात्र यास वराडकर व कुशे यांनी तीव्र विरोध दर्शविला. गेले तीन दिवस मालवण नगरपालिकेच्या गैरकारभाराविरोधात नगरपालिकेच्या समोर उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी उपोषण सुरु केले आहे आज तिसऱ्या दिवशी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांची आज मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आज भेट घेतली. यावेळी कुशे यांनी उपनगराध्यक्ष आणि गटनेते यांना न्यायासाठी उपोषणासाठी बसावे लागते हीच दुर्दैवाची गोष्ट आहे, आधीच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधुनही कारवाई झालेली नाही. वरीष्ठ अधिकारी प्रश्न सोडविणार असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनाच इथे आणा. नगरपालिकेत आम्ही चर्चेस येणार नाही, उपोषण स्थळी जनतेच्या समोरच प्रशासनाने उत्तरे द्यावी. प्रशासनाने कोरोनाची भीती आम्हाला दाखवू नये. आमचे उपोषण आमरण असून प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, आमच्यावर गुन्हे दाखल केलात तरी चालेल असे यावेळी राजन वराडकर व गणेश कुशे यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर उपस्थित होते. उपोषण स्थळी कायदा सुव्यस्था बिघडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
