रात्री आठ वाजल्यानंतर बाहेर पडणे धोकादायक : बागायती नुकसानीचे सत्र सुरूच
*💫बांदा दि.०७-;* ओटवणे कापईवाडी परिसर पुन्हा एकदा गव्यांच्या दहशतीमुळे भयभीत झाला असून दररोज गवे शेती बागायती तसेच वस्तीत घुसून दहशत माजवत आहेत. रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत घराबाहेर पडणे ही जीवावर बेतणार आहे. नुकसानी बरोबर जीवही धोक्यात आला असून वनविभाग मात्र पंचनामा करण्यापलीकडे ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. मंगळवारी रात्री गव्यांच्या कळपाने ओटवणे कपाईवाडी येथील संगीता उपरकर यांच्या शेती बागायतीत धुडगूस घातला. यामध्ये चवळी, मका, मिरची, वाली व इतर उन्हाळी पिकांची नासधूस केली आहे. यात संगीता उपरकर यांचे सुमारे 50 ते 60 हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रूपाली पानगळे, बापू कोठावळे, रमेश वरेकर, रवींद्र कुडाळकर, गंगाराम कोठावळे, अंकुश नाईक यांच्या शेतीचीही यापूर्वी गव्यांच्या कळपाने मोठी नुकसानी केलेली आहे.
