नगरपालिका आणि सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागातर्फे आयोजन..
मालवण (प्रतिनिधी)
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दि. १४ ऑगस्ट रोजी मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा NCC (राष्ट्रीय छात्र सेना) विभाग आणि मालवण मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ४. ३० वाजता सन्मान देशभक्ताचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत डॉ. पंकज सुभाष दिघे यांचे “१९४७ च्या इतिहासापासून आपण काय शिकलो” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच भारतीय सैन्य दलातील ५८ महाराष्ट्र बटालियनचे आर्मी ऑफिसर यांचा सन्मान सोहळा व मुलाखत होणार आहे. हा सन्मान सोहळा झाल्यानंतर सायंकाळी ६. ३० वाजता मालवण शहरातून मशाल फेरी आणि तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.
मशाल फेरी व तिरंगा रॅलीचा मार्ग सिंधुदुर्ग महाविद्यालय – मामावरेरकर नाट्यगृह – भरड नाका – बाजारपेठ मार्गे – फोवकांडा पिंपळ – टोपीवाला हायस्कूल – कन्याशाळा – सिंधुदुर्ग महाविद्यालय असा असणार आहे. तरी या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात मालवण मधील सर्व नागरिक, विविध संस्था, शाळा, कॉलेज, विद्यार्थी, शिक्षक, सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने हातामध्ये तिरंगा घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण नगरपालिका इंडियन स्वच्छता लीग कॅप्टन आणि सिंधुदुर्ग महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष ऍड. समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कूशे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, एनसीसी कॅडेट्स यांनी केले आहे.
