१ लाखाच्या प्रथम बक्षीसासह अनेक बक्षीसांचा होणार वर्षाव..
मालवण (प्रतिनिधी)
नारळी पौर्णिमेनिमित्त भाजपतर्फे भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून पुरुष व महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले. पुरुषांच्या स्पर्धेतील विजेत्याला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून इतर अनेक आकर्षक बक्षीसांचाही वर्षाव होणार आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बाबा मोंडकर हे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक पंकज सादये, दीपक पाटकर, आबा हडकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, संदीप शिरोडकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, नारळी पौर्णिमा हा किनारपट्टीवरील मोठा सण असून नारळी पौर्णिमेची ही संस्कृती सर्वत्र पोहचावी या उद्देशाने भाजपच्या वतीने नारळ लढविणे स्पर्धा आयोजित केली आहे. पुरुषांसाठी आयोजित स्पर्धेत विजेत्यास एक लाख रुपयांचे पारितोषिके माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. महिलांसाठी आयोजित नारळ लढविणे स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन तसेच तिन्ही क्रमांकांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लकी ड्रॉ देखील ठेवण्यात येणार असून त्यातील प्रथम तीन भाग्यवान विजेत्या महिलांना अनुक्रमे सोन्याची नथ, चांदीचा करंडा, चांदीचा छल्ला अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेसाठी नोंदणी करणाऱ्या पहिल्या शंभर महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत. पुरुषांच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ललित चव्हाण (९०९६७२८०४८) यांच्याशी तर महिलांच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भाजप महिला शहराध्यक्षा सौ. अन्वेषा आचरेकर (८१८०९६६८३३) व भाजप कार्यालय – तन्वी परब (७५८८११७८०५) यांच्याशी संपर्क साधावा, दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी यावेळी केले.
तसेच नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन संस्था व रिक्षा चालक मालक संघटना यांच्यातर्फे मालवण भरड नाका ते बंदर जेटी अशी भव्य रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीनिमित्त आकर्षक रिक्षा सजावट स्पर्धा आयोजित केली असून यातील प्रथम तीन विजेत्यांना निलेश राणे यांच्या माध्यमातून अनुक्रमे रू. १५ हजार, रू. १० हजार, रू. ५ हजार व उत्तेजनार्थ दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत. राजकोट किल्ला येथे राजकोट मित्रमंडळातर्फे होणाऱ्या नारळ लढविणे स्पर्धेतील २१ हजार रुपयांचे बक्षीसही निलेश राणे यांच्यामार्फत देण्यात येणार आहे, अशी माहिती बाबा मोंडकर यांनी यावेळी दिली.
