पंतप्रधान आवास योजनेचा निधी न मिळाल्यास पंचायत समितीवर नेणार मोर्चा…

हरी खोबरेकर:निष्ठा यात्रे दरम्यान मालवण तालुक्यातून अनेक तक्रारी प्राप्त..

⚡मालवण ता.१०-: शासनाने पूर्वीचीच इंदिरा आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना या मोठमोठ्या नावाखाली सुरु करून लोकांना घरे बांधण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले. मात्र, काही अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे हप्ते न मिळाल्याने असलेली झोपड़ी तोडून नवीन घर बांधण्यासाठी घेतलेले सर्वसामान्य नागरिक आज अडचणीत आलेले आहेत. निष्ठा यात्रेत मालवण तालुक्यातून याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात शासनाने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान न दिल्यास मालवण पंचायत समितीवर ठाकरे शिवसेनेतर्फे लाभर्थ्यांना घेवून मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मालवण येथील ठाकरे शिवसेनेच्या शाखेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, जिल्हा संपर्क प्रमुख मंदार केणी, महिला तालुका संघटक दिपा शिंदे, शहरप्रमुख बावी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, बंड्या सरमळकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, अक्षय रेवंडकर, प्रसाद चव्हाण, सोनाली डिचोलकर, उपशहरप्रमुख मोहन मराळ, अक्षय भोसले आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेच्या जाहिरातीवर जेवढा खर्च झाला आहे, त्याच निधीतून अनेकांची घरे उभी राहिली असती. घरकुल योजनेसाठी सर्वसामान्यांनी मोठ्या आशेने घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी आपली मातीची घरे, झोपड्या हटविले आणि घर बांधण्यासाठी एप्रिल महिन्यात सुरुवात केली, मात्र आज चार महिने होत आले तरी निधी उपलब्ध होत नसल्याने घरांची बांधकामे रखडली आहेत. काहींनी पहिला हप्ता मिळाला, मात्र दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही. पहिल्या हप्त्यामुळे घरे बांधण्यासाठी गेलेले आज अडचणीत येवून राहण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात जावून राहण्याची वेळ आली आहे. मालवण तालुक्यात अनेक घरे आज अडकून पडली आहेत, लाभार्थी शासनाच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. लाभार्थी आज हताशपणे शासनाच्या अनुदानाच्या आशेवर अवलंबून राहिले आहेत. तालुक्यातील लाभार्थ्यांनी अनुदान मिळाले नाहीत, त्यांनी आपली नावे शिवसेना तालुका कार्यालयात द्यावी. अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. शासनाने यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून न दिल्यास सर्व लाभार्थ्यांना घेवून पंचायत समितीवर मोर्चा नेण्यात येणार आहे, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.

आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात केलेल्या निष्ठायात्रेतून सर्वसामान्य ग्रामस्थांच्या अनेक समस्या समोर आल्या. अनेकांची कामे शासनाकडून निधी रखडल्यामुळे अपूर्ण असल्याचे दिसून आले. राज्याच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गोठा, सिंचन विहीर, बायोगॅस प्रकल्प, शेततळे, वृक्ष लागवड, कंपोस्ट खत, गांडूळ खत टाकी, कुक्कुटपालन शेड आदी कामे मंजूर करण्यात येतात. मालवण तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामगारांच्या मजुरीची तसेच सार्वजनिक आणि वैयक्तिक कामाच्या साहित्याची रक्कम सरकारने थकीत ठेवली आहे. लाभार्थ्यांनी कर्जे काढून, उसनवारी घेऊन या कामांसाठी खर्च केला आहे. मात्र, कामे पूर्ण झाली, तरी शासनाकडून मंजूर कामांसाठी निधी देण्यात आलेला नाही, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

You cannot copy content of this page