पळून गेलेल्या ट्रॉलरबाबत १५ रोजी सुनावणी…

मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदरातील पळून गेलेल्या रत्नागिरी साखरीनाटे येथील ‘एच अताउल्ला’ या एलईडी टॉलर वरील कारवाई बाबत सहाय्यक मत्स्य विभागाचे अधिकारी मुरारी भालेकर यांनी मालवण तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर केले असून याबाबत गुरुवार दि. १५ एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालय येथे सुनावणी होणार आहे. मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त विभागाच्या शीतल या गस्ती नौकेने शुक्रवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील साखरीनाटे येथील अबुझर ए. रौफ हबीब यांच्या ‘एच अताउल्ला’ ( आयएनडी एमएच – ४ एमएम २७२६ ) या टॉलर ला पकडून मालवण बंदरात अवरुद्ध केले होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्री सागरी सुरक्षा यंत्रणेसमोरून एलईडी टॉलरचा तांडेल अनिल खारवी व खलाशी यांनी टॉलरसह पळ काढला. या टॉलरवर महागडा जनरेटर, पाच एलईडी बल्ब व इतर साहित्याचा समावेश होता. सागरी सुरक्षाच्या समोरूनच एलईडी टॉलर पळाल्याने मत्स्यव्यवसाय विभागाची झोप उडाली आहे. याबाबत आज मत्स्यव्यवसाय अधिकारी मुरारी भालेकर यांनी तहसीलदारांकडे एलईडी पळून नेणाऱ्या तांडेल अनिल खारवीवर कारवाई करावी व दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मालवण बंदरातील अवरुद्ध करण्यात आलेला रत्नागिरी साखरीनाटे येथील एलईडी टॉलर पळविण्यासाठी स्थानिक माहितगाराने मदत केल्याची शक्यता मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा माहितगार त्या टॉलरवर बुरखा परिधान करून आला होता त्याने मत्स्यव्यवसाय विभागाच्या सागरी सुरक्षा रक्षकाच्या समोरूनच समुद्रात नांगरण्यात आलेल्या टॉलरची रस्सी कापून खलाशी व तांडेल यांच्या मदतीने टॉलर पळवून लावला अशी शक्यता मत्स्य अधिकाऱ्यांनी तक्रारीत व्यक्त केली. याबाबत मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. हा बुरखाधारी कोण याचा शोध मालवण पोलीस घेत आहेत.

You cannot copy content of this page