Headlines

कोकण विकासासाठी पुढील १२ वर्षांचा रोडमॅप

स्थानिकांना रोजगार व विकासावर भर:विधानपरिषद आ. प्रमोद जठार..

⚡कणकवली ता.०४-: कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील १२ वर्षांचा व्यापक रोडमॅप तयार करण्यात आला असून स्थानिक युवकांना रोजगार, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील सुधारणा यावर विशेष भर दिला जाणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून कोकणातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध मंत्र्यांचे जिल्हानिहाय दौरे आयोजित करून विकासाला गती दिली जाईल, असे प्रतिपादन विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी केले.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

पुढे श्री. जठार म्हणाले, पक्षाने माझ्यावर पालघर ते सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांच्या संयोजकपदाची जबाबदारी सोपविली असून संघटना बळकट करणे, महायुतीतील समन्वय वाढविणे आणि विविध विकासकामांचा पाठपुरावा करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्याची नोडल जबाबदारी माझ्याकडे असून सिंधुदुर्ग हा माझा मूळ जिल्हा असल्याने दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषदेत प्रथमच संधी मिळाल्यानंतर कोकणातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडता आले. सभागृहात तालिका सभापती म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. विधान परिषदेत सदस्यसंख्या कमी असल्यामुळे कोकणाच्या प्रश्नांवर सविस्तर मांडणी करता आली.

कोकणाचा पुढील १२ वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून पायाभूत सुविधा, पर्यटन, उद्योग, शेती, मत्स्यव्यवसाय, रोजगार आणि प्रशासनातील सुधारणा या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. महायुतीचे सरकार आता केवळ आश्वासने देणारे नसून जनतेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करणारे सरकार असल्याचा दावाही त्यांनी केला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना त्यांनी महसूल प्रशासनात मोठ्या प्रमाणावर सुधारणा सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांना भविष्यात बहुतांश महसुली सेवा ऑनलाइन उपलब्ध होतील आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या कमी होतील, असा विश्वास श्री. जठार यांनी व्यक्त केला.

स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिक्षक, महसूल आणि इतर विभागांतील भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, जिल्हा किंवा विभाग संवर्गाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आपण शासनाकडे सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोकणातील हजारो युवकांना आपल्या जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही श्री. जठार म्हणाले.

कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी दोडामार्ग परिसरात मोठा पर्यटन प्रकल्प, सफारी आणि वन पर्यटन विकसित करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच संभाजी महाराजांच्या बलिदानाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे आमदार श्री. जठार यांनी सांगितले.

औद्योगिक विकासाबाबत बोलताना जठार यांनी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प कोकणात उभारण्याचा प्रस्ताव मांडला. यासाठी सुमारे ३०० एकर जमीन सहकार तत्त्वावर भाडेतत्त्वाने उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांना केले. अशा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न, स्थानिक युवकांना रोजगार आणि स्वच्छ ऊर्जानिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास आमदार श्री. जठार यांनी व्यक्त केला.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी आधी संपादित केलेल्या जागेवर प्रकल्पाचा प्रारंभ करून त्याचे परिणाम नागरिकांसमोर आणावेत, अशी भूमिका मांडली. तसेच कोकणात उद्योग उभारताना पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिकांच्या हिताचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाणार रिफायनरी प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी मोठे उद्योग नाकारल्यामुळे रोजगाराच्या संधी गमावल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोकणातील विकासासाठी सकारात्मक भूमिका घेऊन उद्योग, पर्यटन आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणात जास्तीत जास्त विकास प्रकल्प आणणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाला गती देणे, हेच आगामी काळातील आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आमदार श्री. जठार यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page