अन्यथा आंदोलन:सुरेश बापर्डेकर यांचा इशारा..
⚡मालवण ता.०४-:
मालवण नगरपरिषद हद्दीतील अनेक प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाले असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील सर्व खराब रस्त्यांचे १५ ऑगस्टपूर्वी दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा कोणतीही सूचना न देता मालवण नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जागरूक नागरिक सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
मालवण शहरातील भरड नाका–रांगोळी महाराज, रांगोळी महाराज–वाघ पिंपळ तसेच तानाजी नाका–आंबा नाका हे प्रमुख रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. तानाजी नाका ते आंबा नाका सतत पाठपुरावा करून बनविण्यात आला, मग हा रस्ताही गेल्या वर्षापासून आजपर्यंत तसाच खड्डेमय असताना यावर प्रशासनाने दुर्लक्ष का केला. संबंधित अधिकाऱ्यांना आपला विभाग कोणता आहे हे वर्ष होऊन गेलं तरीही अद्याप माहीत नाही, याकरिता दोन महिन्यापूर्वी मी स्वतः गाडीवरून खड्डे आणि रस्ता पाहिल्यावरही अजून कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. जास्त पाऊस आणि गणपती येण्याची प्रशासन वाट पाहत आहेत काय ? वारंवार भेटून तसेच प्रत्यक्ष रस्त्यांवरील खड्डे दाखवूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे आरोप सुरेश बापर्डेकर यांनी केले आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने केवळ वरवरची मलमपट्टी न करता दर्जेदार आणि टिकाऊ डांबरीकरण करावे. निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांची दिशाभूल करू नये. अशा कामांमुळे काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असेही श्री. बापर्डेकर यांनी नमूद केले. विशेषतः वाघ पिंपळ परिसरातील गतिरोधकाजवळ मोठे खड्डे पडल्याने गतिरोधक असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
