कुडाळ : एसटी बस आणि मोटर सायकल त्यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सरंबळ येथील युवक शुभम विठ्ठल परब (वय २५ वर्षे) याचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर यात सरंबळ येथील रमेश जानकर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. सरंबळ तळेकरवाडी येथे आज सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमाराला झाला. आयटी इंजिनियर असलेला एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुडाळ सरंबळ ही सकाळी १०.३० वाजताची दैनंदिन एसटी फेरी आहे. कुडाळ वरून सरंबळकडे गाडी जात असताना अपघातातील मयत शुभम हा सरंबळहुन कुडाळ कडे निघाला होता. अचानक एसटी बस समोर आल्याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने त्याची बसला ड्रायव्हरच्या बाजूने समोरासमोर धडक बसली. ही धडक एवढी जोराची होती की यात शुभम गंभीर जखमी झाला तर याच्या गाडीवर मागे बसलेले रमेश जानकर गंभीर जखमी झाले. अपघातात मोटरसायकलचे नुकसान झाले आहे.
शुभम याला तात्काळ कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान शुभम परब यांचा मृत्यू झाला. तर जखमी रमेश जानकर यांच्या हाता पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची खवर मिळताच सरंबळ सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली.
अपघातातील मयत शुभम परब यांच्या घरची परिस्थिती तशी गरीबीची आहे. आई-वडिलांनी अत्यंत मेहनतीने शुभमला इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण केले होते. अगदी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये टॉपर असणारा शुभमने शालेय शिक्षणापासून इंजिनीयर होत पर्यंत प्रत्येक ठिकाणी टॉपर म्हणून ओळख होती. अष्टपैलू असणारा शुभम अभ्यासाबरोबर कला क्षेत्रात सुद्धा हुशार होता. शुभम परब याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्या अचानक जाण्याने सरंबळ गावावर शोककळा पसरली आहे.
