दशरथ कवटकर:माजी विद्यार्थ्यांकडून भंडारी शाळेस स्मार्ट टीव्ही व एम्प्लीफायर प्रदान..
मालवण (प्रतिनिधी)
माजी विद्यार्थी हे भंडारी हायस्कुलची ताकद असून माजी विद्यार्थ्यांमुळे संस्थेच्या अनेक गरजा पूर्ण होत आहेत, विद्यार्थ्यांनी शाळेला कधी विसरू नये, शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर यांनी केले.
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन २००६- ०७ दहावी बॅच आणि २००८- ०९ बारावी बॅच या दोन्ही बॅचतर्फे भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या बालवाडी विभागाला स्मार्ट टीव्ही तर भंडारी ए. सो. हायस्कुलला म्युझिक एम्प्लीफायर प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम भंडारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी यांच्या पुढाकारातून झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, पत्रकार आणि बॅचचे माजी विद्यार्थी भूषण मेतर आदी उपस्थित होते.
प्रारंभी मानसी परुळेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक भूपेश गोसावी यांनी केले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आलेल्या टीव्ही संचाचे उदघाटन दशरथ कवटकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तर हायस्कुलसाठी एम्प्लीफायर मुख्याध्यापक तिवले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जॉन नरोना यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रति जाण ठेवून केलेली मदत कौतुकास्पद असून यापुढेही विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सहकार्य करत राहावे, असे सांगितले. तर प्रफुल्ल देसाई यांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून स्नेहमेळावा घेण्यासाठी प्रयत्न करावा तसेच त्या माध्यमातून शाळेसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. भूषण मेतर यांनी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी मदत करता आली याचा आनंद असून यापुढेही माजी विद्यार्थ्यांकडून आवश्यक ती मदत शाळेला केली जाईल, असे माजी विद्यार्थ्यांतर्फे सांगितले. या मदतीबद्दल भूपेश गोसावी यांनी आभार मानले.
यावेळी या दोन्ही बॅचचे माजी विद्यार्थी हेमंत शिरगांवकर, भूषण पिसे, नितेश जाधव, केशव साठे, विशाल हेदळकर, दिगंबर कोळंबकर, भालचंद्र आपकर यांसह शिक्षक सौ. राधा दिघे, महेश लोकेगावकर, सौ. पूर्वी गोवेकर, सौ.मानसी परुळेकर, सौ. वैदेही ठाकूर, सौ. वालावलकर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
