सा. बां. विभागाला विचारला जाब:रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास १५ ऑगस्टला रस्त्यावर जनआंदोलन…
⚡मालवण ता.०७-: कसाल राज्यमार्गावर आनंदव्हाळ येथील रस्त्यासह मालवण शहरातील लिमये हॉस्पिटल समोरील रस्ता तसेच फोवकांडा पिंपळ येथील रस्त्याची दुर्दशा होऊन वाहतुकीस धोकादायक बनल्याप्रकरणी आज ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयात धडक देऊन अभियंत्यांना जाब विचारला. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास येत्या १५ ऑगस्टला या रस्त्यावर जनआंदोलन करण्याचा इशारा हरी खोबरेकर आणि शिवसैनिकांनी दिला. त्यावर येत्या तीन चार दिवसात या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांनी दिली.
मालवणात डिसेंबर महिन्यात नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी कसाल मालवण रस्त्यावरील आनंदव्हाळ ते गोवेकर स्टॉप या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्या पावसात हा रस्ता नादुरुस्त होऊन रस्त्यावरील खडी उखडून ती रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल यावेळी हरी खोबरेकर यांनी अभियंत्यांना केला. तर यतीन खोत यांनी मालवण बस स्थानकासमोर साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस नियोजन करण्याची मागणी केली. हा रस्ता गणेशचतुर्थी पूर्वी सुस्थितीत करून रस्त्यावर आलेली खडी झाडून बाजूला करण्यात यावी अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या रस्त्यावर जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा हरी खोबरेकर यांनी दिला. तर यतीन खोत यांनी मालवण बस स्थानक समोरील रस्त्यावर साचणाऱ्या पावसाळी पाण्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही उपअभियंता अजित पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, गणेश कुडाळकर, उमेश चव्हाण, सन्मेष परब, प्रसाद आडवणकर, सुहास वालावलकर, सदा करंगुटकर, प्रवीण लुडबे, उमेश मांजरेकर, अक्षय रेवंडकर, सिद्धेश मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, निनाक्षी मेथर, सोनाली डिचवलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
