एसआरएम मधील महिला रोजगार मेळाव्यात २१२ मुलाखती…

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे आयोजन..

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला महिला रोजगार मेळावा ५ ऑगस्ट रोजी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडला. सदर मेळाव्यात बँकिंग व उत्पादन क्षेत्रातील नामवंत अशा फॉस्कॉन इंडिया लिमिटेड, बी एस एफ आय बँकिंग आणि आय बी एफ बँकिंग या आस्थापनांनकडून उत्पादन कार्य आणि बँकिंग ऑपरेशन्स अशा विविध २१२ पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.


या मेळाव्याची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. मेळाव्याचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगाराभिमुख योजनांची माहिती अधोरेखित केली आणि महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
मेळाव्याचे उद्घाटन वृक्षास जलदान करून करण्यात आले. यावेळी मेळाव्यात समाविष्ट फॉस्कॉन इंडिया लिमिटेड आणि बी एस एफ आय बँकिंग यांचे तज्ञ मार्गदर्शक प्रतिनिधी श्री. योगेश गिजवणे व श्री. सी. एस. कोरे आणि श्री. पंकज तिळवे यांनी अनुक्रमे संबंधित कंपन्यांची आवश्यक पात्रता, कामाचे स्वरूप व फायदे स्पष्ट केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी रोजगाराची सद्यस्थिती व त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करण्याची गरज नमूद केली. महाविद्यालयात असे विविध उपक्रम राबविले जातात असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मेळाव्यात फॉस्कॉन इंडिया लिमिटेड, बी एस एफ आय बँकिंग आणि आय एफ बी बँकिंग या आस्थापनांसाठी अनुक्रमे ३२, ४९ व ५१ उमेदवारांनी मुलाखत दिली आणि नमूद उमेदवारांपैकी ३, ३४ व ४९ उमेदवारांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली.
सदर मेळाव्यास एकूण ८१ महिला उमेदवारांनी सहभाग नोंदविला. या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल, महिला विकास कक्ष, डी. एल. एल. ई आणि एन. एस. एस. या विभागांमार्फत संयुक्तपणे करण्यात आले होते. क. म. शि. प्र. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यास निखिल दवणे (कामगार व रोजगार अधिकारी, मॉडेल करिअर सेंटर, भारत सरकार), सुरज देबाजे (कौशल्य विकास अधिकारी, महाराष्ट्र शासन), श्रीमती. दिव्यानी गावकर (आय बी एफ बँकिंग), डॉ. श्रीधर पवार, डॉ. शरयू आसोलकर, श्री. प्रशांत केरवडेकर, डॉ. दिपक चव्हाण, उमेश कामत, भावेश चव्हाण, खेमराज कुबल, सोमदत्त चव्हाण, रघुनाथ सावंत, प्रा. सुवर्णा निकम, प्रा. काजल मातोंडकर, प्रा. सोनाली आंगचेकर आदि मान्यवर व प्राध्यापक उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाचे समन्वयक डॉ. एन. आर. काळे यांनी करून दिली. सर्व मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. व्ही. सावंत यांनी केले तर आभार गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एस. टी. आवटे यांनी मानले.

You cannot copy content of this page