आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानंतर प्रशासन खडबडून झाले जागे:प्रवासी व नागरिकांमधून समाधान व्यक्त..
कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनंतर कणकवली – बोरीवली व्हाया फोंडा, वैभववाडी फेरी उद्या पासून चालू होणार आहे. अनेक वर्षांनंतर वैभववाडीतून मुंबई, बोरीवली ही एसटी सुरू होत असल्याने प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.
वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न व समस्या याबाबत सोमवारी आमदार नितेश राणे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बसस्थानकाबाबत इतकी उदासीनता का ? जिल्ह्यात काम करण्याची मानसिकता नसेल तर खुशाल राजीनामा द्या. पण जिल्ह्यांची वाट लावू नका. असे खडे बोल आमदार नितेश राणे यांनी विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांना सुनावत धारेवर धरले होते.
वैभववाडी – मुंबई, बोरीवली फेरी चालू करा, दोन वाहतूक नियंत्रक यांची नियुक्ती तात्काळ करा, मानव विकास गाड्या सुरू करा, प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करा, अशा विविध मागण्या भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी व पदाधिकारी यांनी बैठकीत मांडल्या होत्या. सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करा व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी पाटील यांना केल्या होत्या. तसेच श्री. पाटील यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीनंतर राज्य परिवहन मंडळ सिंधुदुर्ग खडबडून जागे झाले आहे. अनेक वर्ष प्रवाशांच्या प्रतीक्षेत असलेली वैभववाडी – बोरीवली एसटी आता धावणार आहे. ही गाडी कणकवली वरून सुटेल, फोंडा, वैभववाडी, तरेळे या मार्गावरुन धावणार आहे. ८ ऑगस्ट पासून ही गाडी सुरू करण्यात येणार आहे. या गाडीमध्ये वैभववाडी व फोंडा या बस स्थानकाकरिता काही सीट कोटा राखून ठेवण्यात येणार आहे. सदर फेरी संगणकीय आरक्षणास उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक, राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभाग कणकवली यांच्याकडून देण्यात आली आहे.
