विद्यार्थ्यांनी आयुष्यातील एकही क्षण वाया घालवू नये…

विशाल परब:हळबे महाविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा..

⚡दोडामार्ग ता.०६-: स्वतःची, कुटुंबाची, समाजाची आणि देशाची प्रगती करायची असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील एकही क्षण वाया घालवू नये. सतत कार्यमग्न राहवे. आपण कुठल्या परिस्थितीतून आलो आहोत, याचे भान ठेवुन धेय निश्चित करावे ते गाठण्यासाठी बेभानपणे अहोरात्र मेहनत करावी, असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, महाविद्यालय विकास समितीचे भाई परमेकर, विवेकानंद नाईक, राजेंद्र केरकर, व हायकोर्टाचे वकील ऍड अनिल निरवडेकर उपस्थित होते.

आपल्या भाषणात श्री विशाल परब पुढे म्हणाले की, सत्कार्याचा चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे पत्रकार करतात. त्यांच्या या कार्याचे आपण स्वागत केले पाहिजे. तुम्ही तरुण आहात, चांगल्याची संगत करा. चांगले कर्म आपणास उत्तम आयुष्य जगण्याची प्रेरणा देते. तुम्हाला आज महाविद्यालयात बसण्यासाठी छान बेंचेस आहेत. आम्ही तर खाली जमिनीवर मांडी घालून बसत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे भरपूर मेहनत करा आणि जीवन सुजलाम सुफलाम बनवा. हे महाविद्यालय आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचे कॉलेज आहे. त्याला पहिल्या क्रमांकावर आणत नाव उज्वल करण्याची जबाबदारी आपली आहे, असे यावेळी विशाल परब यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी श्री.विवेकानंद नाईक यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा चढता आलेख सांगून, कॉलेजला तात्काळ सेमिनार आणि सांस्कृतिक हॉलची गरज आहे. त्यासाठी विशाल परब साहेबांनी आपले योगदान द्यावे अशी विनंती केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनीदेखील हे महाविद्यालय दुर्गम डोंगराळ प्रदेशात असून विकासापासून ते दूर आहे. इथे अनेक समस्या असतानाही आम्ही ते चालवतोय. तेव्हा जिल्ह्यातील आपल्यासारख्या थोर मान्यवरांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन केले.

त्याला प्रतिसाद देताना विशाल परब म्हणाले की कॉलेजचे जे काही प्रश्न आहेत, ते मी सोडवण्याचा मी प्रामाणिक भावनेतून नेहमीच प्रयत्न करेन. केवळ शब्द न देता दिला शब्द पुरा करत सेमिनार हॉलच्या विकासासाठी विशाल परब यांनी व्यासपीठावरच एक लाख अकरा हजाराची मदत महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सुपूर्द केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी.डी गाथाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय खडपकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. सोपान जाधव यांनी मांनले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्यासह एडवोकेट अनिल निरवडेकर, संस्था संचालक श्री भाई परमेकर, उद्योजक श्री विवेकानंद नाईक, गोव्यातील प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ श्री राजेंद्र केरकर, भाजपा दोडामार्गचे माजी तालुकाध्यक्ष श्री रंगनाथ गवस, खोकरल सरपंच देवेंद्र शेटकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पराशर, प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, शिक्षक डॉ.संजय खडपकर, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, सुधीर पनवेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page