येत्या काळात शिंदे शिवसेनेत प्रवेशाचे अनेक मोठे फटाके फुटणार…

पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर व दीपक वेतकर यांनी केला दावा..

मालवण (प्रतिनिधी)-:मालवण- कुडाळ विधानसभा मतदार संघावर आजपर्यंत शिवसेनेचेच वर्चस्व असून आगामी विधानसभा निवडणुकीतही या मतदार संघातून धनुष्यबाण चिन्हवरील शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार आहे. या मतदार संघातून धनुष्यबाण निशाणीवर लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छूक असून लवकरच अनेक बडे चेहरे शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले दिसून येतील. येत्या दहा ऑगस्टला शिवसेना नेते रविंद्र फाटक सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येत असून यावेळी शिवसेना पक्ष प्रवेशाचे अनेक मोठे फटाके फुटणार आहेत. आम्ही या मतदार संघातून लढण्यासाठी सज्ज आहोत असे प्रतिपादन शिंदे गट शिवसेनेचे कुडाळ- मालवण मतदार संघाचे निरीक्षक बाळा चिंदरकर व दिपक वेतकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

मालवण शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक होऊन पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिंदे गट शिवसेनेचे कुडाळ- मालवण मतदार संघाचे निरीक्षक बाळा चिंदरकर व दिपक वेतकर, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शहरप्रमुख प्रियांका मेस्त्री, ऋत्वीक सामंत, हर्षद पाटकर, प्रथमेश सावंत, मिहिर राणे, क्रांती धुरी, दर्शना मालंडकर, गुड्डीन फर्नांडिस, गितांजली लाड, किसन मांजरेकर, भक्ती कवटकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, गीता नाटेकर, सुरेखा आस्वलकर, कविता मोंडकर, आशा वळपी, निलम शिंदे, अश्विन हळदणकर, चंद्रकांत गोलतकर, अरूण तोडणकर, शिवम हिर्लेकर, कमलकांत पारकर, शुभम सावंत, भावेश सावंत तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईकर चाकरमान्यांना मोफत कोकणात आणण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार प्रत्येक गावात एसटी अगर लक्झरी बसेस सोडून चाकरमान्यांना मोफतपणे गणपती उत्सवासाठी कोकणात आणणार आहोत. शिंदे यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. कोकणातील प्रत्येक घरात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेतून प्रस्ताव सादर होण्यासाठी आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रत्येक घरापर्यंत राज्य शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत. नौसर्गिक आपत्तीमध्येही अनेक कुटुंबियांना मदतीचा हात सरकारने दिलेला आहे. लवकरच याचे परिणाम सर्वत्र दिसून येणार आहेत, म राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता पूर्ण बहुमतात येवून शिंदे हेच मुख्यमंत्री होणार आहेत, असा यावेळी दावा बाळा चिंदरकर आणि दीपक वेतकर यांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार कोण हे महायुतीत ठरविले जाणार असले तरी शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेच असणार आहेत, असेही चिंदरकर आणि वेतकर म्हणाले.

येत्या काळात शिवसेनेत प्रवेशाचे अनेक फटाके फुटणार आहेत. आम्ही लहान लहान फटाके न फोडता मोठे फटाके फोडणार आहोत. शिवसेना नेते रविंद्र फाटक यांच्या पहिल्याच दौऱ्यात अनेकांनी प्रवेश केला आहे. आता दुसऱ्या दौऱ्यात याहिपुढील चित्र दिसून येणार आहे. आणि निवडणुकीपर्यंत मालवण कुडाळ मतदार संघात शिवसेनेचे मजबुत संघटन दिसून येईल. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वास देणार असून नवनवीन कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्यांवर कायमच विश्वास राहणार असून नवीन कार्यकर्त्यांना संघटनात्मक पदे निर्माण करून त्यांनाही संधी देण्यात येणार असल्याचेही श्री. चिंदरकर व वेतकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page