लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे व्यापारी संघाचे आश्वासन;आठ दिवसानंतर तोडगा काढण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* शासनाने कोरोना रोखण्यासाठी ५ एप्रिलपासून कडक निर्बंध घातले आहेत. याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम येत्या आठ दिवसात दूर करण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.त्यामुळे आम्ही आठवड़ाभर सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी येत्या आठवडाभर शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, व सचिव नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. शासनाने ५ एप्रिल पासून राज्यात करोणा रोखण्यासाठी कडक निर्बंध घातले आहेत. सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील .तर शनिवार, रविवार सर्व व्यवसाय कडकडीत बंद राहतील .असे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार कोणते व्यवसाय सुरू राहणार आणि कोणते बंद राहणार या बाबतचा उलगडा होत नाही. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी आज व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या आदेशामुळे जो व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे याबाबत आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून येत्या आठ दिवसात आपला संभ्रम दूर केला जाईल. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी काही निर्बध शिथील करता येतील का? याबाबत विचार केला जाईल. असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ची साखळी रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. येत्या आठवडाभर शासनाने घातलेल्या कडक निर्बंधाचे व्यापारी काटेकोर पालन करतील. जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे सचिव नितीन वाळके, राजन नाईक, दीपक बेलवलकर, श्रीराम शिरसाट, नितीन तायशेटे, द्वारकानाथ धुरये, आदी उपस्थित होते.
