कणकवली शहरातील तळेकर सेल्स मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडले…

⚡कणकवली ता.०१-: शहरातील आपासाहेब पटवर्धन चौकातील तळेकर सेल्स मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडले. त्या दुकानातील दोन मोबाईल व १ हजार रोख रक्कम असे मिळून ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी मोबाईल शॉपीचे मालक विनायक शैलेश तळेकर (रा. वैभववाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक तळेकर यांच्या तळेकर सेल्स मोबाईल दुकानाचे मॅनेजर प्रवीण प्रकाश राणे यांनी बुधवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले होते गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास प्रवीण राणे यांनी मोबाईल शॉपी उघडली, असता त्यांना दुकानावरील पत्रांचे स्क्रू काढून पत्रे उघडलेले दिसले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती दुकानाचे मालक विनायक तळेकर यांना दिली.

विनायक तळेकर हे दुकानात येऊन दुकानाची पाहणी केली असता त्यांना दुकानांमधील सॅमसंग व ओप्पो कंपनीचा प्रत्येकी ३३ हजार रुपयांचा मोबाईल व कॅश काउंटरमधील १ हजार रुपयाची रोख रक्कम दिसून आली नाही. त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचे लक्ष्यात येताच त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

You cannot copy content of this page