साईप्रसाद काणेकर:मच्छिमार्केट इमारत लोकार्पण न केल्यास १५ ऑगस्टला फटाके व ढोल वाजवून उदघाटन करणार..
बांदा/प्रतिनिधी-: बांदा शहरातील देऊळवाडी, रामनगर भागातील पाणीप्रश्न तसेच शहरातील विविध समस्या याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात धडक देणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी दिली आहे. शहरातील आळवाडी येथे नूतन मच्छिमार्केट इमारत बांधून पूर्ण झाली असून अद्याप त्याचे लोकार्पण न केल्याने जनतेच्या सेवेसाठी १५ ऑगस्ट रोजी फटाके व ढोल वाजवून उदघाटन करणार असल्याचेही श्री काणेकर यांनी सांगितले.
श्री काणेकर म्हणाले कि, बांदा शहरातील जनतेला अनेक समस्याना तोंड द्यावे लागत असून कित्येक विकासकामे ही प्रलंबित आहेत. देऊळवाडी रामनगर येथील पाणी प्रश्न हा गंभीर आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. गेली ३० वर्षे बांदा ग्रामपंचायतवर भाजपची एकहाती सत्ता आहे, मात्र सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहराचा विकास खुंटला असून याला पूर्णपणे जबाबदार हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे ठाकरे शिवसेनेच्या वतीने धडक देऊन सर्व समस्याबाबत जाब विचारण्यात येणार असल्याचे काणेकर यांनी सांगितले.
