गाळा तातडीने पाळा:अन्यथा भाजप आंदोलन करणार;नीलेश राणेंचे जिल्हधिकाऱ्यांना निवेदन
*💫मालवण दि.०५-:* मालवण शहरातील भाजी मंडईच्या जीर्ण इमारतीमध्ये आठ पैकी सात गाळे पालिकेने पाडताना एका नगरसेवकाच्या ताब्यातील गाळ्याला अभय दिले आहे. याबाबत भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तक्रार करूनही या गाळयावर कोणतीही कारवाई केली नसून हा गाळा तातडीने पाडण्यात यावा, अन्यथा भाजपला आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदना द्वारे दिला आहे. या पत्रात म्हटले आहे की, मालवण मधील भाजीमार्केट इमारतीचे बांधकाम हे जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे सदर इमारतीचे सात गाळे पाडण्यात आले. फक्त एकच गाळा भाजीमार्केट आरक्षण क्र. २४ मधील गाळा क्र. १ (१) पाडण्यात आला नाही. कारण तो एका पक्षाच्या नगरसेवकाचा आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच नगरसेवकांनी सर्व पुरावे देऊन सुद्धा सदर गाळा न पाडण्याचे कारण काय? फक्त सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाचा गाळा असल्याने त्याचा गाळा न पाडता इतर सर्वांचे गाळे पाडण्यात आले हा कसला व कुठला न्याय? इतर गाळे इमारतीचे बांधकाम जीर्ण अवस्थेत असल्याने पाडण्यात आले. तसेच भाजीमार्केट आरक्षण क्र. २४ मधील गाळा क्र. १ (१) गाळा सुद्धा पाडण्यात यावा आणि सर्वांना समान न्याय द्यावा. याबाबतीत आपण लवकर कार्यवाही करावी अन्यथा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला या बाबतीत आंदोलन उभे करावे लागेल. तरी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने आदेश द्यावेत, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
