रामेश्वर मच्छिमार सोसायटीने स्पष्ट केली भूमिका
⚡मालवण ता.३०-: एलईडी लाईट पर्ससीन मासेमारीला शासनाने मान्यता द्यावी. जुन्या पर्ससीन परवान्यांचे नूतनीकरण करण्याबरोबरच नव्याने पर्ससीन परवाने दिले जावेत, या जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनने केलेल्या मागण्यांशी आम्ही अजिबात सहमत नाही. अवैध अशा एलईडी पर्ससीनला परवाना देण्यास आणि नव्याने पर्ससीन परवाने देण्यास आमचा विरोधच राहील, असे आज मालवण दांडी आवारवाडी येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन मत्स्य धोरणात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा याबाबत भूमिका मांडली होती. यामध्ये एलइडी लाईट मासेमारीला परवानगी द्यावी अशी भूमिका फेडरेशनतर्फे घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज श्री रामेश्वर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष जगदिश खराडे यांनी संस्थेच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक घेत एलईडी आणि पर्ससीन मासेमारीबाबत फेडरेशनने घेतलेल्या भूमिकेस तीव्र विरोध दर्शविला. एलईडी लाईट मासेमारी व पर्ससीन मासेमारीला परवाना देण्यास आमचा विरोध आहे. जे पारंपारिक मच्छीमारांचे धोरण तेच आमचे धोरण आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या हिताआड येणारी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संस्थेकडून मांडण्यात आली.
यावेळी अध्यक्ष जगदिश खराडे, उपाध्यक्ष हेमंत जोशी, सचिव सतेजा वायंगणकर, तज्ञ संचालक अक्षय रेवंडकर, जीवन भगत, तुषार आचरेकर, रविंद्र चांदेरकर, दिलीप पराडकर, मृणाली कोयंडे, रुपेश साळगावकर आदी संचालक मंडळ उपस्थित होते.
