मालवण (प्रतिनिधी)
देवबाग येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त १४ ते २१ जुलै या कालावधीत हरिनाम सप्ताह साजरा होणार असून १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. त्यादिवशी वर्षातून फक्त एकदाच आषाढी एकादशीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेता येते, त्यामुळे या सोहळ्यास देवबाग दशक्रोशीतील भाविकांची मोठीं गर्दी होणार आहे.
दि. १७ जुलै रोजी देव शयनी आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे काकड आरती श्रींच्या मुर्तीला अभिषेक नित्य पूजा झाल्या नंतर सकाळी ७ वाजल्या पासून देवदर्शनाला सुरूवात होणार आहे. हे देवदर्शन उत्तर रात्री पर्यंत चालू राहणार आहे. यानिमित्त संध्याकाळी ५ वाजल्या पासून विविध दिंड्या देव दर्शना साठी मंदिरात येतात. यामध्ये तारकर्ली येथील तारी घराण्याची दिंडी देवबाग येथील भांजी वाडीची व भाटकर यांच्या दिंडी सहभागी होतात. तसेच सप्ताह समाप्तीच्या पुर्व संध्येला देवबाग येथील मांजरेकर घराण्याची दिंडी वाजत गाजत देवदर्शनाला येते. सप्ताहा दरम्यान पंचक्रोशीतील विविध भजनीं मंडळे आपलीं भजन सेवा विठ्ठल चरणी अर्पण करतात. आषाढ पौर्णिमेला काला उत्सवाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या काला उत्सवा मध्ये भगवान विष्णूच्या दशावतारावर आधारित विविध खेळ खळले जातात. यावेळी उपस्थित बाल गोपाळाना लाह्या व दह्याचा प्रसाद दिला जातो, शेवटी समुद्र स्नान करून ओल्या अंगाने श्रीकृष्णाची आरती करून कार्यक्रमाची सांगता होते.
या हरिनाम सप्ताह दरम्यान सहभागी होणाऱ्या भजनीं मंडळांना देवस्थानच्या वतीने प्रवास खर्च म्हणून १००० रू. व अल्पोपहाराची सोय केली जाते. तसेच ज्या भावीकानां भजनाचा कार्यक्रम प्रायोजित करायचा असल्यास त्यांनी 9145380340, 9405226031, 9420441398 या क्रमांकावर संपर्क साधावा. या कार्यक्रमांस भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव विठोबा देवालय देवबाग विश्वस्त व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
