कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव कार्यशाळेचे आयोजन शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयकडॉ.निलेश सावे यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कला सादरीकरण बाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.निलेश सावे, सिंधुदुर्ग जिल्हयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.आशिष नाईक व डॉ.नितिन वळंजू तसेच कुवळे हायस्कूलचे चेअरमन विजयकुमार कदम व पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठामध्ये विविध सांस्कृतीक प्रकारात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यानी आपल्या विविध कला सादर केल्या व येणाऱ्या युवा महोत्सवामध्ये सहभागी होताना आपण सादरीकरण कसे करावे, कोणत्या चुका टाळाव्यात अशा विविध बाबींवर मार्गदर्शन केले.
अशा प्रकारचे युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचे प्रमुख केंद्र आहे, असे मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.निलेश सावे यांनी सांगितले. या कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका श्रीमती. मयूरी कुंभार मॅडम यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, प्राध्यापक वर्ग व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सोनी वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या सुपर सिंगर या कार्यक्रमाचे वाद्यवृंदातील वैशिष्टय ठरलेले विजय जाधव यांनी आपल्या ढोलकीवादनाने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले तर विद्यापीठात सिंधुदुर्गची गान उंचावणारा ‘Golden Boy’ हा किताब पटकविणारा आपल्या देवगडचा सुधांशु सोमण याने आपल्या गायकीने सगळ्यांचीच मने जिंकली तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठातील रांगोळी विभागातील गोल्ड मेडलिस्ट कु. विलास रहाटे हा देखील उपस्थित होता. तसेच कार्टूनिस्ट श्री.चोपडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे कार्टून्स काढून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. आपल्या कोकणात कला भरपूर आहेत. त्याला फक्त बाहेर आणण्यासाठी याच कार्यक्रमांचा आधार असतो, असे श्री. आशीष नाईक यांनी सांगितले. यावेळी एकाच व्यासपीठावर गुरु-शिष्य देखील एकत्र उभे असल्याचे चित्र पाहता आले.
अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्यामागे हाच हेतु असतो की युवा महोत्सवासंदर्भात विद्यार्थ्यांचे असणारे गैरसमज दूर करता यावेत.तसेच विद्यार्थ्यांच्या मनात असणारी भिती कमी व्हावी.
