२०१३ पासून होते मालवणमध्ये कार्यरत
*💫मालवण दि.०३-:* मालवण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मंगेश माने यांची कोल्हापूर येथे जिल्हा बदली झाली आहे. माने हे २०११ साली सिंधुदुर्ग पोलीस दलात भरती झालेल्या माने यांनी २०१३ पासून मालवण पोलीस ठाण्यात सेवा बजावली. गंभीर गुन्ह्यांचा तपास करतानाच आपल्या कर्तव्यदक्षतेने त्यांनी वेगळी छाप सोडली. मालवण पोलीस ठाण्यातील मंगेश माने व विद्या नाईक या दोन पोलीस अंमलदांरांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली. त्यानिमित्त मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, भारत फारणे, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, शीतल पाटील यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते. यावेळी माने यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समयोचित भाषणे झाली. माने यांनी पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, विश्वजित बुलबुले, विनीत चौधरी, सोनू ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्ह्यांचा तपास करत संशयित आरोपींना गजाआड करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. खलाशी खूनप्रकरण, चोरीप्रकरण, बनावट पासप्रकरण यासह अवैध दारू वाहतूक, अवैध दारूसाठ्यावर धाडी तसेच अवैध जुगारावर छापेमारी करून आरोपींना गजाआड करण्यास माने यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावत पोलीस दलाची प्रतिमा उंचावली होती. कोरोना लॉकडाऊन काळातही त्यांनी चांगली सेवा बजावली. गतवर्षी रात्रीची गस्त घालत असताना थंडीत कुडकुडणाऱ्या निराधार महिलेची माने यांनी विचारपूस करत तिचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर देऊन तिला जेवणही देत खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या कार्याची दखल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून घेतली गेली असून त्यांना रिवार्ड तसेच प्रमाणपत्रही बहाल करण्यात आले आहे.
