संजय जोशी:टोपीवाला हायस्कुलमध्ये गुणवंतांचा गौरव..
⚡मालवण ता.०९-: सध्याच्या काळात करियरच्या अनेक संधी आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांनी भविष्यातील गरजा ओळखून अभ्यास करावा असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक संजय जोशी यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल मधील दहावी परीक्षेतील तसेच विविध स्पर्धा परीक्षामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मालवण एज्युकेशन सोसायटी तर्फे गौरव करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रमुख अतिथी संजय जोशी, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, पर्यवेक्षक विजय गोसावी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक वळंजू यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, एसटीएस परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच दहावी परीक्षेतील प्रथम दहा क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तर दहावीत तालुक्यातून प्रथम आलेल्या कैवल्य मिसाळ याचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात अकरावा आलेल्या श्रेयस बर्वे आणि राज्यात सोळावा आलेल्या कैवल्य मिसाळ यांना गौरविण्यात आले. टोपीवाला विद्यार्थी ग्राहक भांडाराच्या वतीनेही विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी लक्ष्मीकांत खोबरेकर, शिक्षिका सौ. ज्योती तोरसकर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश धामापूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. वळंजू, श्री. धामापूरकर, श्री. शिरोडकर, श्री. नाईक, श्री. सामंत, श्री. वाकूडे, सौ. सामंत, सौ. तोरसकर देविदास वेरलकर या शिक्षकांचे सहकार्य लाभले.
