Headlines

तत्कालीन मुख्याधिकारी जावडेकर यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार..

पार्किंगसाठी भंडारी हायस्कूल ग्राउंड घेण्याचा केला होता प्रयत्न;संस्था मुंबई अध्यक्ष पाटकर यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी) मालवणात आलेल्या वाहनधारकांना त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगच्या व्यवस्थेसाठी भंडारी ए सो हायस्कूलचे पटांगण ताब्यात घेऊ पाहणाऱ्या मालवण नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या कार्यपद्धतीबाबत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी नाराजी व्यक्त करून याबाबत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधताना कोकण आयुक्तांकडे दाद मागितली आहे दरम्यान, कोकण आयुक्तांनी त्याबाबत कोणतेही उत्तर न दिल्याने पाटकर यांनी अखेर माहिती अधिकाराचा वापर करीत उत्तर मगितले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी जर स्वतःचा अधिकार वापरून वाटेल तो निर्णय घेऊ लागले तर नागरिकांनाही राज्यघटनेने अधिकार दिलेले आहे. अधिकाऱ्यांनी मनमानी करीत जर कायद्याचा चुकीचा अर्थ लावून कारभार हाकायचा ठरवल्यास त्याचे समाज व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतात म्हणून अशा पद्धतीला आळा घालण्यासाठी या प्रकरणी आपण लढा सुरूच ठेवणार आहोत असा इशारा विजय पाटकर यांनी दिला आहे गेल्यावर्षी गणेशोत्सव काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू असताना मालवण बाजारात खरेदी साठी वाहनाने आलेल्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी मालवण नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी भंडारी एज्युकेशन सोसायटीला विश्वासात न घेता प्रशाळेचे पटांगण अधिग्रहित (ताब्यात) घेण्याचा फतवा काढला होता याबाबत भंडारी एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी आक्षेप घेत कोणत्या अधिकारात अशा प्रकारे ग्राहकांच्या गाड्या लावण्यासाठी खाजगी संस्थेची जागा घेण्यात आली ? अशी विचारणा नगरपालिका प्रशासनाकडे करत माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितली होती. मालवण नगरपालिके कडून मिळालेल्या माहितीत आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू केलेला साथ रोग कायदा १८९७ या कायद्यांमधील तरतुदींनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्याकडून आपती काळात मालवण शहरात मुख्याधिकारी यांची इंसिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी भंडारी हायस्कुलच्या पटांगणाची जागा ताब्यात घेतली अशी माहिती नगरपालिकेने दिल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. याबाबत विजय पाटकर यांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्त यांना पत्र पाठवत या प्रकाराबाबत लक्ष वेधत तक्रार मांडली होती. आपत काळात उपाययोजनांसाठी एखादी खाजगी जागा किंवा वास्तू ताब्यात घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांना असताना कायदा वाकवून गणेशोत्सव काळात बाजार राहाटीला आलेल्या लोकांची वाहने उभी करण्यासाठी जागा अधिग्रहित करण्यात येत असल्याचे सांगत भंडारी हायस्कुलचे पटांगण ताब्यात घेण्याची जी कार्यवाही झाली ती अयोग्य असल्याचे श्री पाटकर यांनी पत्रात म्हटले आहे. बाजारात आलेल्या लोकांनी गाड्या कुठे उभ्या कराव्यात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून यात कोणते संकट आले ? शाळेची जागा ही शाळेची मालमत्ता आहे. कोणाची खासगी वाहने उभी करण्यास आम्ही जागा का द्यावी? याच्याशी शिक्षण संस्थेचा संबंध काय ? गणेशोत्सव काळात शाळेला सुट्टी असते, गाडीतील सामान चोरीला गेले असा आरोप केला तर त्याला मुख्याधिकारी जबाबदार राहणार का ? मुख्याधिकाऱ्यांची इंसिडन्ट कमांडर म्हणून नियुक्ती केली ती कोरोना संकट निवारण्यासाठी की कोणाची खासगी वाहने शाळेच्या जागेत उभी करण्यासाठी ? असे अनेक सवाल श्री. पाटकर यांनी उपस्थित करीत या प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली आहेत, तसेच याबाबत कोकण आयुक्तांकडेही महिन्याभरापूर्वी एका पत्राद्वारे उत्तर मागितले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी तसेच आयुक्तांचे या प्रकरणी लक्ष वेधुन महिना उलटला तरी प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने श्री पाटकर यांनी आता माहितीच्या अधिकारात उत्तर मागितले असून हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे श्री पाटकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page