मडुऱ्यासाठी स्वतंत्र तलाठी द्या…

उपसरपंच बाळू गावडे: सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे मागणी..

⚡बांदा ता.०५-: मडुरा व पाडलोस गावातील शेतकऱ्यांना कर्जाची उचल करताना आठ अ किंवा सातबारा मिळण्यासाठी अनेक दिवस तलाठ्याची वाट पहावी लागते. सद्यस्थितीत सातार्डा तलाठी यांच्याकडे मडुऱ्याचा चार्ज आहे. त्यामुळे ते केवळ दोन दिवस उपलब्ध असतात. अन्य दिवशी शेतकरी, विद्यार्थी यांना तलाठ्याविना कागदपत्रांसाठी खेपा माराव्या लागतात. त्यामुळे मडुरा सजासाठी स्वतंत्र तलाठी द्यावा अशी मागणी मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.


मडुरा सजा तलाठी कार्यालयांतर्गत मडुरा व पाडलोस ही दोन गावे येतात. शेकडो शेतकरी मडुरा व पाडलोस विकास सोसायटी मधून कर्जाची उचल करतात. यासाठी सातबारा व आठची आवश्यकता आहे. परंतु कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होते. दोन तीन किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या शेतकऱ्यांना तलाठी नसल्याने त्या दिवसाची वाट पहावी लागते. त्यामुळे मडुऱ्यासाठी स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दाखवल्याचे उपसरपंच बाळू गावडे यांनी सांगितले.
नविन कार्यालयाची पाहणी करूनच परवानगी द्या : गावडे
मडुरा येथे बांधण्यात आलेल्या नविन तलाठी कार्यालयाबाबत अनेक त्रुटी असून प्रत्यक्षात पाहणी केल्याशिवाय त्यास परवानगी देऊ नये असे बाळू गावडे यांनी तहसीलदार यांना सांगितले. तसेच पुलाचे बांधकाम करताना गावातील तीन वाड्याना पाणीपुरवठा करण्यात येणारी पाईपलाईनचे नुकसान केले व अद्यापपर्यंत ती दुरुस्ती केली नसल्याची बाळू गावडे यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली.

You cannot copy content of this page