⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ रेल्वेस्थानकावर वरील प्लॅटफॉर्म क्र.2 वर 65 वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला. या मृतदेहाची ओळख सायंकाळी उशिरापर्यंत पटली नव्हती. याबाबतची खबर रेल्वे पोलीस प्रदीप रामवतार कुमार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
गुरुवारी सकाळी रेल्वे पोलीस प्रदीप रामवतार कुमार कणकवली रेल्वे स्थानक येथे आपल्या ड्युटीवर आले. त्यानंतर सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वे स्थानक मास्तर यांनी दूरध्वनीवरून त्यांना कुडाळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.2 वर एक वृद्ध व्यक्ती झोपलेली असल्याचे सांगितले. त्यानंतर लागलीच प्रदीप कुमार येथील रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी पाहणी केली असता , सदर व्यक्ती हालचाल करीत नव्हती. नंतर 108 रुग्णवाहिका बोलविण्यात आली. त्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सदर व्यक्ती मृत झाल्याचे सांगितले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. हवालदार अनिल पाटील व स्वप्नील चव्हाण यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतदेहावर पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट ,निळ्या रंगाची फुलं ट्रकपँन्ट आहे. सोबत तपकिरी रंगाची बँग, लाल रंगाची बेड शीट तसेच आयटेल कंपनीचा मोबाईल मिळाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. कुडाळ पोलीस तपास करीत आहेत.
