मालवण बंदर जेटी ते दांडी पर्यंत कोस्टल रोड व्हावा…

सौरभ ताम्हणकर यांनी निलेश राणे यांचे वेधले लक्ष..

⚡मालवण ता.३०-: मालवण बंदर जेटी ते दांडी येथील दांडेश्वर मंदिरपर्यंत कोस्टल रोड झाल्यास मालवणच्या पर्यटनाला आणखी चालना मिळेल. तसेच या कोस्टल रोडमुळे किनारपट्टीवरील असलेले कचऱ्याचे साम्राज्यही दूर होऊन समुद्री उधाणाचा किनारपट्टीला बसणारा फटकाही कमी होईल, त्यामुळे मालवणच्या पर्यटन विकासाच्या हा कोस्टल रोड होणे गरजेचे आहे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालवण शहरातील तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांवर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे नेते मा. निलेश राणे यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवण शहरातील कचऱ्याच्या समस्येवर उपाययोजना तसेच मालवण बंदर जेटी ते दांडी येथील दांडेश्वर मंदिरापर्यंत कोस्टल रोड व्हावा, अशा मागण्या सौरभ ताम्हणकर यांनी निलेश राणे यांच्याकडे केल्या आहेत.

मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेला शहर आहे. दर महिन्याला मालवण शहराला देश विदेशातील लाखो पर्यटक भेट देत असतात. ‘नेव्ही डे’ दरम्यान मालवण शहरात स्वछता ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता मालवण शहरातील कचऱ्याची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. मालवण शहरात ठीकठिकाणी कचरा रस्त्यावर पसरलेला आहे. तर मालवण मच्छी मार्केट समोरील बाजूस कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत सकाळी सदर जागा स्वच्छ करण्यात येते. परंतु काही वेळानंतर परत त्या ठिकाणी घाण टाकली जाते. ते कचरा टाकणारे लोक कोण आहेत ते परप्रांतीय व्यापारी आहेत का? की येथील स्थानिक व्यापारी? याकडे नगरपालिकेने लक्ष घालावा. मालवण नगरपालिका कर्मचाऱ्यांतर्फे मच्छीमार्केट स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली. यावेळी मच्छीमार्केट व परिसरात डास प्रतिबंधक फवारणी केली. परंतु त्या ठिकाणी काही तासात परत घाण टाकण्यात आली व त्या मोहिमेचा काही फायदा झाला नाही. बाजारपेठेत ठोस अशी उपायोजना करण्यात यावी, असे ताम्हणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

मालवण शहरात पर्यटकांची ओढा अजून वाढला असून मालवण बंदर जेट्टी ते मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिरापर्यंत कोस्टल रोड होणे गरजेचे आहे. जेणे करून मालवण बंदर जेट्टीवर आलेला पर्यटक कोस्टल रोडच्या सहाय्याने समुद्राच्या लाटांचा आनंद घेत दांडेश्वर मंदिरापर्यंत जाऊ शकतील. त्याचप्रमाणे किनारपट्टी भागात कचऱ्याचे पसरलेले साम्राज्यही या रोड मुळे कमी होईल. मालवण शहरातील दांडी परिसरात अतिवृष्टीवेळी किंवा समुद्राला उधाणाच्या वेळेस समुद्राचा पाणी वस्तीत येते. कोस्टल रोडमुळे हे देखील बऱ्याच प्रमाणात कमी होईल. हा रोड अस्तित्वास आल्यास मालवण शहरात पर्यटनास आणखी चालना मिळेल, असेही ताम्हणकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page