सेवा देत नसाल तर वीज विल वसुली कसली करताय ?

वीज ग्राहक संघटनेचा महावितरणला संतप्त सवाल:वीज ग्राहकांसाठी ४ जुलैला कुडाळमध्ये जनता दरबार..

⚡कुडाळ ता.२६-: जिल्ह्यातील वीज समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वीजपुरवठा खंडित होणे, संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक मिळणे, तक्रारीसाठी फोन केले तर ते फोन बंद असणे, अधिकाऱ्यांची मनमानी अशा तक्रारींचं प्रमाण जिल्ह्यात वाढत चालले आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग  जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने येत्या ४ जुलै रोजी  वीज ग्राहकांच्या  जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली. त्याच बरोबर व्यापारी महासंघाच्या वतीने संजय भोगटे आणि कुडाळ तालुक्यातील वीज ग्राहकांच्या वतीने तालुकाध्यक्ष गोविंद सावंत यांनी आपली भूमिका मांडली.
       यावेळी बोलताना श्रीराम शिरसाट म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज समस्या आहेत. त्या मिटत नाहीत. याबाबत उन्हाळ्यात तक्रार केली तर ट्री कटिंग सुरु असल्याचे सांगितले जाते. आणि पावसाळ्यात तक्रर केली तर झाड पडले, फांदी पडली अशी करणे सांगितली जातात. मग हि कामे पावसाच्या आधी का होत नाहीत ? याच कामांची कारणे देत वीज पुरवठा मात्र उन्हाळ्यात खंडित केला जातो. ट्री कटिंगवर मोठ्या प्रमाणात  पैसे खर्च होतो, पण ट्री कटिंग होत नाही, मग हा पैसा  जातो कुठे, याचा आम्ही वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून शोध घेणार आहोत. तसेच लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कुडाळ सारख्या शहरात दिवसातून चारपाच वेळा एक एक तास लाईट जाते. फोन केलातर कामे सुरु असल्याची उत्तरे दिली जातात. काही वेळेला फोन बंद लागतात. काही वेळेला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट उत्तरे मिळतात. अशा प्रकारे सेवा राहिली तर मात्र जेव्हा हे वीज अधिकारी-कर्मचारी वीज विल वसुलीसाठी येतील तेव्हा त्यांना अडवण्यात येईल असा इशारा श्रीराम शिरसाट यांनी दिला. सेवा देत नसतील तर वीज बिल वसुलीचा अधिकार त्यांना राहणार नाही. वीज खंडित झाल्याची तक्रार करायची तर यांचे फोन बंद असतात. आणि वीज बिल भरले नाही तर मात्र हे लाईट कट करतात.. मग आता लोकांनी यांची लाईट कट करायची का ?  फोन उचलत नाहीत तर ऑफिसला टाळ लावायचे  का ? याबाबत अधीक्षक अभियंत्यांनी कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. पण तसे काही झाले नाही. त्यासाठीच हा  वीज ग्राहकांचा जनता दरबार येत्या ४ जुलै रोजी कुडाळ मध्ये घेणार आहोत. सकाळी ९ ते १० यावेळी नोंदणी होईल. आणि सकाळी १० ते १२.३० या वेळेत तक्रारी मांडता येतील. याबाबत गावागावात जाऊन जनजागृती सुद्धा केली जाणार आहे.  यावेळी राज्य अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त वीज ग्राहकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. शिरसाट यांनी केले आहे. त्याच दिवशी प्रताप होगाडे यांच्यासह जिल्हाधिकारी यांची सुद्धा भेट घेणार असल्याचे श्रीराम शिरसाट यांनी सांगितले.
      कंत्राटी कर्मचारी श्री. फाले यांच्या मृत्यू प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात संबंधित वीज अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्याबद्दल कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला आणि श्री. कऱ्हाडकर यांचे श्रीराम शिरसाट यांनी आभार मानले. आता या वीज अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करावी आणि फाले यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी श्री. शिरसाट यांनी केली आहे.
      यावेळी बोलताना कुडाळ तालुका व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष संजय भोगटे म्हणाले, जिल्ह्यात होत असलेल्या विजेच्या खेळखंडोबाबाबत व्यापारी महासंघाच्या वतीने वेळोवेळी  महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यांना नोटीस देखील पाठविली पण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी ती स्वीकारली नाही. याबाबत आम्ही प्रकाशगड येथे भेट देऊन विनोद पाटील यांची तक्रार केली. त्याची दखल घेऊन विनोद पाटील यांची आता सिंधुदुर्गमधून बदली झाली आहे. पण एवढ्यावरच ना थांबता विनोद पाटील यांचे निलंबन होण्याच्या दृष्टीने व्यापारी महासंघाच्या वतीने प्रयत्न केले जातील  असे श्री. भोगटे यांनी सांगितले. अधिकारी, वायरमन यांचे फोन बंद लागतात याकडे देखील श्री. भोगटे यांनी लक्ष वेधले. कुडाळ शहराच्या वीज अभियंता छाया परब यांच्या बद्दलच्या ग्राहकांच्या  तक्रारींचा पाढाच संजय भोगटे यांनी वाचला. भूमिगत वाहिन्यांचे फॉल्ट काढण्यासाठी यंत्रणा आहे मग उघड्यावर ज्या वाहिन्या असतात त्यांचे फॉल्ट काढण्याची आधुनिक यंत्रणा महावितरणकडे का नाही, असा सवाल श्री. भोगटे यांनी केला. जनता दरबाराला सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा उपस्थितीत राहावे असे आवाहन श्री. भोगटे यांनी यावेळी केले.
     कुडाळ तालुका अध्यक्ष गोविंद सावंत यांनी कुडाळच्या शहर अभियंता छाया परब यांच्या कार्यपद्धतीबाबत कमालीचा संताप व्यक्त केला. त्या अधिकारी स्वतःची मनमानी करतात. फोन उचलत नाहीत. त्यांचा आम्ही निषेध करतो असे म्हणले. बदली झालेले अधीक्षक अभियंता यांची बदली होणे हि काळाची गरज होती असे गोविंद सावंत यांनी सांगितले. कुडाळ पोलिसांनी वीज अधिकाऱ्यांवर जो गुन्हा दाखल केला त्याबद्दल श्री. सावंत यांनी त्यांचे कुडाळ तालुका वीज ग्राहकांतर्फे अभिनंदन केले. यावेळी ऍड. नंदन वेंगुर्लेकर, द्वारकानाथ घुर्ये, जयराम डिगसकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page