पदवीधर शिक्षकांचा मतदानाचा अधिकार डावलला…

रजा मंजूर असताना शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेसाठी सक्ती:राज्य प्राथमिक शिक्षक समितीने व्यक्त केली तीव्र नाराजी..

⚡कुडाळ ता.२६-: महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी जे मतदार आहेत अशा सर्वच पदवीधर मतदार असलेल्या शिक्षकांना सामान्य प्रशासन विभाग यांचे २३ जून २०२४ च्या आदेशाने विशेष नैमितिक रजा मंजूर केलेली आहे . मात्र शिक्षणाधिकारी (प्राथ)जि.प. सिंधुदुर्ग यांनी सायंकाळी उशिरा पत्र काढून तो मतदारांना घटनेने दिलेला अधिकार नाकारून सकाळ सत्रात शाळा भरणेस सक्ती केलेली आहे ही बाब खेदजनक आहे. ही मनमानी असून त्या बाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करीत आहोत. असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यमहासचिव राजन कोरगावकर यांनी व्यक्त केले.
याबद्दल प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, एकतर प्रशासनाने शाळांची व्यवस्था करावी किंवा अशा शाळा बंद ठेवाव्यात. मात्र विशेष नैमितिक रजा अमान्य करणे पूर्णतः नियमबाह्य आहे. शासनाच्या आदेशाविरुद्ध एखाद्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांनी असे पत्र काढणे म्हणजे शासनाच्या धोरणाचा अवमान करण्यासारखे आहे. अशाच प्रकारे संध्याकाळी उशिरा पत्र काढून शालेय व्यवस्थापन बिघडल्यामुळे शिक्षिकाप्रती समाजात गैरसमज निर्माण होतो. प्राथमिक शिक्षक मतदार जरी कुडाळात सेवेत असला तरी त्याच्या प्रमाणपत्रावरील मूळ गावच्या पत्त्यावरच त्याचे मतदान केंद्र ठरत असते. त्यामुळे कुडाळ येथे सेवेत असूनही मतदानासाठी दोडामार्ग, कणकवली पर्यतचा प्रवास मतदाराला करावा लागणार आहे. सायंकाळी अखेरच्या क्षणी कोणता निर्णय घ्यावा ?कारण मुलांना सूचना पोहचू शकत नाहीत. अशा संभ्रमावस्थेत प्राथमिक शिक्षक आला आहे. 26 जून 2024 हया दिवशी मतदान आहे. प्राथमिक शाळेतील पदवीधर मतदारही त्यात सहभागी होऊ शकतो, त्यासाठी शाळांचे नियोजन आधीच करणे अपेक्षित असताना शेवटच्या क्षणी असे निर्णय घेणे, शिक्षण विभागाने आतातरी थांबवले पाहिजेत. यापूर्वीही आदल्यादिवशी रात्री 10 वाजता योगदिनाच्या वेळेबाबत व्हाॅटसॲपवरून अचानक सूचना दिलेल्या होत्या. समाजाचा शाळेविषयीचा दृष्टिकोन मलिन होतो. आजच्या शाळांच्या वेळेचा परिणाम मतदानावर होऊ नये ही अपेक्षा आहे.
तसेच याबाबत सामान्य प्रशासन विभाग व पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्याकडे योग्य ती तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यमहासचिव यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page