तत्काळ दुरुस्ती करा; पंढरीनाथ मसुरकर यांची मागणी..
⚡मालवण ता.२४-: मसुरे कावावाडी आणि टोकळवाडी यांना जोडणारा लोखंडी साकव जीर्ण झाला आहे. या साकवाच्या लोखंडी प्लेट खराब झाल्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून लोखंडी साकव ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी सुरक्षित बनवण्याची मागणी मसुरे भंडारी समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर यांनी केली आहे.
कालावल खाडी किनारी मसुरे कावावाडी-टोकळवाडी या दोन छोट्या वाड्या आहेत. टोकळवाडी ग्रामस्थ, विद्यार्थी या साकवावरून ये-जा करतात. साकवाच्या वरच्या बाजूच्या प्लेट खराब झाल्या असून ठिकठिकाणी तुटल्या आहेत. ग्रामस्थ लाकडी फळ्या टाकून ये-जा करण्यासाठी या साकवाचा वापर करत आहेत. परंतु हा प्रवास धोक्याचा असून प्रसंगी जीवितहानीची शक्यता आहे. त्यामुळे साकवाची दुरुस्ती करण्याची मागणी मसुरकर यांनी केली आहे.
