मच्छिमारांच्या आपत्काळातील मदतीसाठी ‘फेरा’ योजना राबवावी…

सिंधुदुर्ग भाजपा मच्छीमार सेलची राज्यसरकारकडे मागणी..

⚡मालवण ता.२२-: मच्छीमार कायम आपत्कालीन परिस्थितीच्या फेऱ्यांमधून जात असतो. ज्यामध्ये काही फेरे हे निसर्गनिर्मित असतात तर काही मानव निर्मित असतात. नैसर्गिक आपत्ती, अपघात ,मासेमारीतील अतिक्रमण यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. किनारपट्टीवर दरवर्षी होणाऱ्या दुर्घटनेत मच्छीमारांच्या मालमत्तेचे नुकसान होते तसेच वित्त आणि जीवितहानी होते. आपत्ती काळात मच्छिमारांना मदत मिळण्यासाठी मच्छिमार समुदाय आपत्कालीन सहाय्यता अभियान म्हणजेचा फेरा योजना राबवावी, अशी मागणी भाजपच्या सिंधुदुर्ग मच्छिमार सेल तर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आपत्ती काळात होणाऱ्या नुकसानीच्या भरपाई साठी मच्छिमारांना काही प्रमाणात शासकीय मदत उपलब्ध आहे. तर काही वेळा विम्याचा आधार मिळतो. पण या दोन्ही गोष्टी तुटपुंज्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीचे परिणाम कमी करण्यासाठी अथवा तात्कालीन किंवा कायमस्वरूपी मदतीसाठी काही विशिष्ट निधी खाजगी माध्यमातून (CSR Funds) अथवा सरकारच्या योजनेतून तात्काळ मिळणे गरजेचे असते. यादृष्टीने भाजपा मच्छीमार सेल, सिंधुदुर्ग शासकीय पातळीवर मत्स्य व्यवसायिकाला तात्कालिक व कायमस्वरूपी मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच याबाबत शासकीय निर्णय आणि अस्तित्वात असलेल्या योजना यांच्या निकषात बदल घडविण्याठी प्रयत्न करणार आहे.

नुकत्याच वेंगुर्ला आणि तळाशील येथे घडलेल्या दुर्घटनेमध्ये मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवित हानी झाली आहे. यासाठीच मच्छीमार समुदाय आपत्कालीन सहाय्यता अभियान (Fisherfolk Emergency Relief Abhiyan) म्हणजेच FERA (फेरा) ही योजना तात्काळ सरकारने राबवावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मत्स्योद्योग मंत्री तसेच किनारपट्टी वरील आमदार, खासदार, यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. महाराष्ट्र सरकारने फेरा योजना सुरू करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page