Headlines

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व समाजघटकांचा सहभाग महत्त्वाचा…

प्रभारी कुलगुरू डॉ. अजय भामरे:मालवणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..

⚡मालवण ता.१९-: शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, भारतीय ज्ञान परंपरा, कौशल्य, संस्कृती व इतिहास यांचे ज्ञान अवगत व्हावे या दृष्टीने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी साठी मुंबई विद्यापीठाकडून पथके तयार करून मार्गदर्शन करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व समाजघटकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी येथे बोलताना केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणीव जागृती कार्यशाळांची मोहीम सुरू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर यूजीसी मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरी कार्यशाळा मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात संपन्न झाली. मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स विभागाच्या अधिष्ठाता डॉ. कविता लघाटे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविकांत सांगुर्डे, अण्णा लीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र पाटील, विद्यापीठाच्या रत्नागिरी सब कॅम्पसचे प्रमुख डॉ. पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवर मार्गदर्शक तसेच पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, संस्था सचिव चंद्रशेखर कुशे, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, मालवण नगरपरिषदेचे अधिकारी श्री. परब हे उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रवास, शिक्षण तज्ञाचे योगदान, अंमलबजावणीचे विविध टप्पे याबाबत डॉ. भामरे यांनी आपल्या भाषणात सविस्तर विवेचन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर विद्यार्थ्यांना नवनवीन संधी प्राप्त होतील आणि प्राध्यापकांना देखील नवीन शैक्षणिक प्रयोग करता येतील, असे बाळासाहेब पंतवालावलकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

यावेळी प्र. कुलगुरु डॉ. अजय भामरे यांचा बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कक्ष समन्वयक डॉ. उज्वला सामंत यांनी आभार मानले.

या कार्यशाळेंतर्गत तीन सत्रे संपन्न झाली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक, विद्यार्थी, पालक यांना डॉ. कविता लघाटे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. रविकांत सांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page