मंत्री केसरकर:जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल..
⚡सावंतवाडी ता.१९-: सकल मराठा समाजाच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही,ई डब्ल्यू एस दाखल्या बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून ते वितरीत करण्याच्या सूचना तहसिलदार यांना देण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन बोलताना सांगितले.
सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या आडमुठ्या धोरणामुळे मराठा समाजाची मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात, याबाबत सावंतवाडी तहसिलदार यांना जाब विचारल्या नंतर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून याबाबतची माहिती दिली, तेव्हा श्री केसरकर यांनी एकाही मराठा समाजाच्या मुलांवर शैक्षणिक अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल,याबात आपण जातिनिशी लक्ष घालून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले.
मराठा समाजाच्या मुलांचा शैक्षणिक प्रश्न सुटला नाही तर शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी शासनाची राहील असे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी म्हटले आहे.
