बबन शिंदे:मालवण- कुडाळचा पुढील आमदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून येईल…
⚡मालवण ता.१०-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात प्रथमच भाजपच्या निशाणीवरील उमेदवार निवडून आला. भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयात शिवसेनेने खारीचा वाटा उचलला. मालवण कुडाळ मतदार संघाने राणे यांना २६, २३६ एवढे मताधिक्य दिले. या मतदार संघातील आमदार वैभव नाईक यांनी काम न केल्यामुळेच जनतेने विनायक राऊत यांना नाकारले. हे मताधिक्य आम. नाईक यांचे अपयश असून त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. येत्या विधानसभा सभा निवडणुकीत देखील जनतेची अशीच साथ महायुतीला मिळून मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघातून धनुष्यबाण चिन्हावर महायुतीचा आमदार निवडून आलेला असेल, असा विश्वास शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मालवण सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर मध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शिवसेनेचे मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, उपतालुकाप्रमुख उदय गावडे, पराग खोत, अरुण तोडणकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, तालुकाप्रमुख आशा वळपी, शहरप्रमुख गीता नाटेकर, विभागप्रमुख गीतांजली लाड, उपविभागप्रमुख भक्ती कवटकर, श्रीहरी खवणेकर, विशाल आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बबन शिंदे म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या या विजयात कुडाळ- मालवण तालुक्यातील शिवसेना आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा आहे. नारायण राणे यांच्या रूपाने कोकणात भाजपचे कमळ फुलले आहे. कुडाळ- मालवण मतदार संघातून मिळालेले मताधिक्य पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असून विद्यमान आमदारांसाठी ही धोक्याची घंटा असेल. लोकसभा निवडणुकीत आता मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीत ३५ हजारापर्यंत कसे जाईल, यादृष्टीने येत्या काळात मतदार संघात काम केले जाणार आहे, असेही शिंदे म्हणाले.
मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात विनायक राऊत यांना मतदार संघातील जनतेने नाकारल्याचे दिसून आले. शिवाय राऊत यांच्या विजयासाठी आमदार नाईकांनी कामच केले नसल्याचा आरोप श्री. शिंदे यांनी केला. राऊत यांना आपल्या मतदार संघातून मताधिक्य मिळवून देण्यात आमदार नाईक हे अपयशी ठरले त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही श्री. शिंदे यांनी केली. ठाकरे शिवसेनेत अंतर्गत वाद आहेत, मात्र सर्व एकत्र आहोत, असे दाखविले जाते. विनायक राऊत हे ओरिजनल शिवसैनिक आहेत तर वैभव नाईक हे काँग्रेसमधून आलेले आहेत. त्यामुळे वर्चस्वाची लढाई सुरु असून अंतर्गत वादाचा फटका श्री. राऊत यांना बसल्याचेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रजा गावकर म्हणाले, महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांचे नाव घोषित केल्यानंतर उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे वेगळ्याच अविर्भावात वावरत होते. त्यांना आपल्या उमेदवाराचा सहज विजय होईल असे वाटत होते. मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर यांनी रणनीती आखत नियोजनबद्ध प्रचार केला. त्यामुळेच राणेंचा विजय झाला. विनायक राऊत यांच्यानंतर आता आमदार वैभव नाईक यांची वेळ आहे. त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणूकित धूळ चारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यांना बबन शिंदे, राजा गावकर शिंदे गटात गेल्याने कोणताही फरक पडणार नाही असे वाटत होते. मात्र आम्ही लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगली प्रचिती घडवून आणली. कुडाळ मालवण मतदार संघ हा शिवसेनेचा असल्याने या मतदार संघात महायुतीचा उमेदवार हा धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढविणारा असावा अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याची मागणी आम्ही वरिष्ठांकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत, किरण सामंत यांनी महायुतीचे काम केले नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता श्री.गावकर म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवाराचा सामंत बंधूंकडून प्रभावी प्रचार करण्यात आला. मात्र राणे यांना या जिल्ह्यातून मताधिक्य न मिळण्याची अन्य कारणे आहेत. यात विरोधकांकडून झालेला अपप्रचार हे प्रमुख कारण आहे. या अपप्रचाराला रत्नागिरीतील जनता बळी पडल्याने राणेंचे मताधिक्य घटल्याचे श्री. गावकर यांनी स्पष्ट केले.
