कीटकांचा त्रास कमी झाला नाहीतर आत्मदहन…

नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थांचा इशारा:वरिष्ठ गोदाम अधिकारी ७ जूनला करणार गोदामाची पाहणी..

 
⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ एमआयडीसी मध्ये असलेल्या महाराष्ट्र वखार महामंडळाच्या धान्य गोदामातून वस्तीत येत असलेल्या टोकासदृश्य कीटकांचा त्रास अजूनही संपलेला नसल्याने या रहिवाशांनी आज गोदामासमोर आमरण उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. तीन-तीन वेळा भेटूनसुद्धा गोदाम साठा अधीक्षक  समृद्धी नांदगावकर कीटकांच्या बंदोबस्ताबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याने ग्रामस्थांनी गोदाम प्रशासनाचा निषेध केला. अखेर तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेतील मुद्द्यांना अनुसरून  या कीटकांचा बंदोबस्त करू अशी लेखी ग्वाही दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले. मात्र कीटकांचा हा त्रास थांबला नाही तर, आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    नेरूर गोंधयाळेवाडीतील ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी येथे असेलेल्या धान्य गोदामातून येणार्या कीटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत या ग्रामस्थांनी १३ मे रोजी गोदाम प्रशासनाला पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यांनतर ३० मे रोजी गोदामला धडक देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी या कीटकांचा बंदोबस्त करू अशी ग्वाही गोदाम प्रशासनाने दिली होती. पण त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी आज सकाळी गोदामासमोर आमरण उपोषण सुरु केले.
     ग्रामस्थांनी उपोषणस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. कीटकांचा त्रास कमी करा, गोदाम खाली करा अशा घोषणा दिल्या. दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान गोदाम साठा अधीक्षक समृद्धी नांदगावकर मात्र उपोषणस्थळी फिरकत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्या ओरोसला गेल्याचे त्यांनी ग्रामस्थांना कळविले. तहसीलदार आल्यानंतर काही वेळाने समृद्धी नांदगावकर आल्या. त्यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नाची सरबत्ती केली. गोदाम प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. वाहतूकदार जर धान्य उचलत नसतील तर त्याचा ठेका रद्द करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली. त्या दरम्याने गोदामातील हमाल शौचासाठी उघड्यावर जातात ही बाबसुद्धा समोर आली. त्याला हि बाब खूप गंभीर असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.
      समृद्धी नांदगावकर यांनी कीटकांचा बंदोबस्त करू अशी ग्वाही देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यावर ग्रामस्थांनी लेखी पत्राची मागणी केली. तसे लेखी पत्र गोदाम प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले. त्या पत्रात म्हटले आहे कि, गोदामातील सर्व साठा रिकामी करण्याबाबत कलेक्टर साहेब जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. हमालांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करणेबाबत अभियांत्रिकी शाखा व विभागिय व्यवस्थापक यांना कळविण्यात आले आहे. धान्याची उचल लवकरात लवकर करून कामकाज सुरळीत करण्याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयास कळविण्यात आले असून त्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. गोदामातील किड्यांचा प्रादुर्भाव रोखाण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरून फवारणी व धुरीकरण करत असून लवकरात लवकर हा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण गोदामास बारीक जाळी बसवून घेण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविले असून त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करू.आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही वरिष्ठ कार्यालयास कळविले असून आपल्या आरोग्यविषयक जबाबदारीबद्दल विचारणा केली आहे. त्याबद्दल च्या त्यांच्या उत्तराबाबत आपणास कळविण्यात येईल. तसेच या उपोषणाबाबत आपणास आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक ७ जून रोजी कुडाळ वखार केंद्रास भेट देण्याचे आश्वासन दिले असून त्या दिवशी आपणा ग्रामस्थांना कल्पना देण्यात येईल. आपण स्वत: येऊन त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून आपले म्हणणे मांडावे.
      हे पत्र मिळताच ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केल्याचे सांगितले. दरम्यान याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर मात्र आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.  
      या उपोषणात नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर यांच्यासह शेखर गावडे, मंगेश राऊत, महेश राणे, श्याम गावडे, निलेश गवाणकर, विजय गावकर, कृष्णा मार्गी, अजित मार्गी, शिल्पा गावडे, लक्ष्मण लोके, चिदानंद कोरगावकर, वसंत गावडे, रामचंद्र कांबळी, गौरी गवाणकर, दिशा गवाणकर,शारदा गावडे, चंद्रकांत गावडे, लक्ष्मण महाजन, दिनेश  करीलगेकर, नेहा गावडे, हार्दिक गावडे, परशुराम करीलगेकर, संतोष धुरी, प्रभाकर गावडे, प्रांजल गावडे, रुचिदा कोरगावकर, प्रल्हाद जावकर सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page