फुकेरी धरण बांधताना आक्षेप घेण्यास 10 जून पर्यंत मुदत…

भूसंपादन न करताच काम आले करण्यात:साईप्रसाद कल्याणकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष..

बांदा/प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील धरणाच्या कामाला चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. काम सुरू झाल्यानंतर धरणाचे ७५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. धरणाचे काम निम्म्यापेक्षा अधिक झाले असताना चार वर्षांनंतर उपजिल्हाधिकारी, भूसंपादन यांनी जमीन मालकांना २ मे रोजी भूसंपादनाच्या नोटिसा बजाविल्या आहेत. जमीन मालकांनी १० जूनपर्यंत या संदर्भात आक्षेप नोंदवायचे आहेत. भूसंपादन न करता धरणाचे काम करण्यात आले. हे काम बेकायदेशीरपणे करण्यात आले असून या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांना पत्र पाठवून सदरचे काम थांबवून संबंधितावर कारवाई करावी अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
फुकेरी (ता. दोडामार्ग) येथील धरणाला जानेवारी २०-२१ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०-२१ मध्ये तांत्रिक मान्यता मिळून हे काम मेमध्ये सुरू झाले होते. सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी धरणाचे भूमिपूजन केले होते. सुमारे ७० कोटी रुपये अंदाजपत्रक असलेले हे धरण आहे. या धरणांतर्गत २४८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तर ५.३ दशलक्ष चौरस घन फूट मीटर जलसंचय होणार आहे. धरणाची उंची ४४.१ मीटर आहे, तर लांबी ३४५ मीटर आहे. धरणाचे पाणी ९०० मीमी लोखंडी पाईपने झोळंबे, तळकट कोलझर या गावांना शेतीसाठी देण्यात येणार आहे. या धरणाच्या कामाला सुरुवात झाली, परंतु जमीन मालकांना चार वर्षात कोणत्याही भूसंपादनाच्या नोटिसा देण्यात आल्या नाहीत. तसेच धरणाचे काम करताना मोठ्या प्रमाणात वृक्षहानी झाली. धरणाच्या ठिकाणी जाण्यासाठी करण्यात आलेल्या रस्त्यासाठी वृक्षतोड करण्यात आली आहे.
चार वर्षे जमीन मालकांना भुसंपादनाच्या नोटीसा न देता हे काम सुरू करण्यात आले. या धरणासाठी सुमारे १०० हेक्टर जमीन बाधित होणार आहे. जमीन मालकांना भूसंपादनाच्या नोटिसा न देता तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक काम करण्यात आले आहे आणि आता जमीन मालकांना नोटिसा बजावून त्यांचे आक्षेप मागवण्यात आले आहेत. भूसंपादनाच्या नोटिसा न देता चार वर्षे सतत काम करण्याचा हा विक्रमच आहे, असे नमूद करीत हे काम बेकायदेशीर असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी केली आहे.
त्यांनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण चौकशीसाठी पोलीस महासंचालकांकडे पाठवले आहे. शासनाने या संदर्भात कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. फुकेरी धरण व्हावे, अशी दोडामार्ग तालुक्यातील तळकट, उगाडे, झोळंबे या गावातील शेतकऱ्यांची मागणी होती. कळणे नदीवर हे धरण होत असून या धरणाला गोव्याने आक्षेप घेतला होता. पेडणे तालुक्यातील चांदेल येथील जलसंचय प्रकल्पावर या धरणाचा परिणाम होणार असल्यामुळे हा आक्षेप घेण्यात आला होता. परंतु या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. मात्र धरणाचे काम ७५ टक्क्यापेक्षा अधिक झाले आहे. फुकेरी हा गाव इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये येतो. त्यामुळे वन विभागाची मान्यता आवश्यक आहे. परंतु ही मान्यताही घेण्यात न आल्याचा दावा कल्याणकर यांनी केला आहे. या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page