मोबदला सहा महिन्यात मिळण्याची प्रमुख अट;जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेणार:श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत
*💫सावंतवाडी दि.२९-:* माजगाव चिपटेवाडी येथे होऊ घातलेल्या व गेले कित्येक वर्ष रखडलेल्या धरण प्रकल्पाच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असुन प्रकल्प अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक नुकतीच माजगाव महादेव मंदिरात पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांकडून प्रकल्पाला होकार देण्यात आला मात्र जमीन तसेच स्थावर मालमत्तेसह मोबदला येत्या सहा महिन्यात जमा करा आणि वनसंज्ञा जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना द्या अशी मागणी केली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रकल्प अधिकारी तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिली आहे. माजगाव चिपटेवाडी येथे खाजगी आणि राखीव वनक्षेत्र मिळून एकूण 9. 26 हेक्टर मध्ये 2009 मध्ये लघु धरण प्रकल्पाला शासन मंजुरी मिळाली होती मात्र खाजगी जमीनीचा मोबदला न मिळाल्याने तसेच वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे हा धरण प्रकल्प रखडला होता. गेल्या वर्षीपासून या प्रकल्पासंदर्भात पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत 2012 मध्ये या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर ठेकेदारही निश्चित करण्यात आला आहे, जवळपास आठ कोटी 47 लाख रुपये या प्रकल्पाला मंजुर असून. प्रकल्पाला बाधित होणारी राखीव वनजमीन वनविभागाला बदली स्वरूपात कोल्हापूर शाहूवाडी वाकोली येथे देण्यात आली आहे, याबाबतची सर्व पूर्तता पूर्ण झाली आहे त्यामुळे वनविभागाची आडकाठी आता या धरण प्रकल्पाला येणार नसून ज्या शेतकऱ्यांची खाजगी जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न आता उरला आहे. जमिनीचा मोबदला तसेच इतर काही शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेता त्या सुटल्यास धरण प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. गुरुवारी माजगाव महादेव मंदिरात यासंदर्भात कुडाळ आंबडपाल येथील जलसंधारण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राजकुमार देवशेट्टे, सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली बैठकीमध्ये देवशेट्टे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना धरण प्रकल्प संदर्भातील माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्याच्या वतीने संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबू सावंत याने येत्या सहा महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला स्थावर मालमत्तेसह रेडी रेकनरनुसार खात्यात जमा झाला पाहीजे तसेच या धरण क्षेत्रामध्ये ज्या जमीनीला वनसंज्ञा लागली आहे अशा जमिनीचाही मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे कारण गेली कित्येक वर्ष ही जमीन शेतकरी कसत असल्याने शासनाने शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी केली. याचबरोबर धरणातील संचित पाणी माजगाव गावाला प्राधान्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठी देण्यात यावे, वन संज्ञा तसेच खाजगी क्षेत्र ठरवून दिले पाहिजे, भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे आदी मागण्या ठेवल्या. यावेळी श्री देवशेट्टे यांनी वनसंज्ञा तसेच रेडीरेकनर बाबत शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचे स्पष्ट केले. या बैठकीला शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अभय सावंत, नारायण सावंत, रमेश राणे, विठ्ठल सावंत, प्रवीण सावंत, प्रल्हाद सावंत, कायदेशीर सल्लागार ऍड शामराव सावंत ऍड कृष्णा सावंत, तसेच रमेश नार्वेकर, अनंत सावंत,परेश सावंत, भिवा सावंत,दाजी सावंत आधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
