मारेकऱ्यांना गजाआड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
⚡दोडामार्ग ता.२७ वैभव साळकर-: मणेरी येथील नदीपात्रात खून करून टाकलेला त्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला अखेर यश आले आहे . त्याचे नाव बाळासाहेब उर्फ बालाजी उर्फ पावण्या रामभाऊ कांबळे मूळ रा.अंबेजोगाई बीड असे असून तो मागील दोन वर्षांपासून बिचोली गोवा येथे कामाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र तो मणेरीत कसा आला ? आणि त्याचे मारेकरी कोण ? याचा उलगडा करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मणेरी येथे तिलारी नदीपात्रात ४ मे रोजी आंघोळीसाठी गेलेल्या काही युवकांना कुजलेल्या स्थितीत एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता .त्याच्या अंगावर एक अंडरवेअर वगळता इतर कोणतीही वस्तू सापडली नव्हती .तर त्याच्या उजव्या हातावर बालाजी , लक्ष्मी , ज्योती आणि डाव्या हातावर रेणुका अशी नावे गोंदलेली होती.त्यामुळे सदरचा मृतदेह हा परप्रांतीय इसमाचा असावा असा अंदाज पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तविला होता .मात्र त्याच्या शवविच्छेदन अहवलात त्याचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.परिणामी प्रथम खून करून नंतर मृतदेह पुलावरून खाली पाण्यात टाकला असावा असा तर्क पोलिसांनी काढून अज्ञात एसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता .पण तो कोण ? आणि कुठला ? त्याचे मारेकरी कोण हे शोधण्यासाठी त्याची ओळख पटविण्याचे कठीण आव्हान पोलिसांसमोर होते.मात्र त्यात पोलिसांना यश आले आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास करून त्याची ओळख पटविली असून त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तो बिचोली गोवा येथील कामगार असल्याचे समजले. परिणामी त्यांनी गोव्यात जाऊन संपूर्ण माहिती घेतली असता त्याची ओळख पटली .
चौकट –
२५ एप्रिल पासून होता बेपत्ता –
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मृताच्या मित्रपरिवाराकडून तपासात महत्त्व पूर्ण माहिती मिळाली.तो २५ एप्रिल पासून बिचोली येथून निघून गेला होता .त्यावेळी त्याच्या अंगावर पिवळा टी शर्ट परिधान केलेला होता तर पाठीमागच्या बाजूस त्या शर्ट वर जयेश २२ असे लिहिले असल्याचे समजले.
चौकट –
माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन –
मृतदेह मिळालेली व्यक्ती ही २५ एप्रिल पासून बिचोली सोडून गेली होती .त्यानंतर ती दोडामार्ग तालुक्यात कोणाकडे कामाला आली होती का ? किंवा कोणाला दिसली होती का ? याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केले आहे.
चौकट –
मारेकऱ्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान ?
मणेरी येथे तिलारी नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे अशक्य प्राय वाटणारे आव्हान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने लिलया पेलले .मात्र त्याच्या मारेकऱ्यांना गजाआड करताना पोलिसांची खरी कसोटी लागणार आहे. मृत बाळासाहेब कांबळे हा दोडामार्ग तालुक्यात कसा पोहचला ? तो कोणाकडे कामाला होता का ? जर नव्हता तर त्याचा गोव्यातच खून करून मग त्याला मणेरीत आणून नदीपात्रात टाकले असेल का ? आणि तसे असल्यास आरोपी एक किंवा त्यापेक्षा अधिक होते का ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहेत शिवाय त्याच्या खुनात त्याच्या जवळचे निकटवर्तीय किंवा मित्रपरिवारातील कोणी नाही ना ? या प्रश्नाची उकल करताना पोलिसांचा चांगलाच कस लागणार आहे
फोटो – मृत बाळासाहेब कांबळे
