५ एप्रिल पासून खाडीपात्रातच उपोषण करण्याचा सरपंचाचा इशारा
मालवण : (प्रतिनिधी) रेवंडी- तळाशील खाडीपात्रात काही व्यक्तींनी खालची रेवंडी किनाऱ्यालगत असलेले कांदळवन व पतन विभागाच्या बंधाऱ्यांची तोड करून अनधिकृत पणे खाडीपात्रात जांभा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात आहे. या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्याने खाडीपात्रात जोरदार अतिक्रमण सुरू सुरू असून खाडी पात्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास दि ५ एप्रिल पासून खाडीपात्रातच उपोषण करण्याचा इशारा रेवंडी सरपंचासह ग्रामस्थांनी दिला आहे. रेवंडी खाडीपात्रात कांदळवन तोड करून होत असलेल्या या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. शासकीय पंचनामे झाल्यानंतर खाडीपत्रातील कांदळवनाची तोड करतानाच बंधाऱ्याची तोडफोड झाल्याचे स्पष्टही झाले. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सदर व्यक्तीनी अतिक्रमण वाढवण्यास सुरवात केली असून आता तर कांदळवनच्या छोट्या झाडांचीही तोड करण्यात आली आहे. अशी माहिती सरपंच प्रिया कांबळी व माजी सरपंच युवराज कांबळी यांनी दिली आहे. यावेळी सदस्य प्राजक्ता चेंदवनकर, जानव्ही कांबळी, विजय कांबळी, भावेश कांबळी, सचिन मोर्वेकर, अमोल वस्त, नरेश करलकर, सुधीर कांबळी, लक्ष्मण रेवंडकर व अन्य उपस्थित होते. कांदळवन, बंधारा तोड व अतिक्रमण प्रकारामुळे खाडीचा प्रवाह बदलून रेवंडी व तळाशील गावांना मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे. पावसाळी उधाणात तर मोठे नुकसान होणार आहे. याच ठिकाणी ग्रामस्थ गणेश मूर्ती विसर्जन करतात. मासेमारीही केली जाते. त्या सर्व गोष्टींवरही परिणाम होणार आहे. अतिक्रमण करण्यासाठी बेकायदेशीरपणे मातीचे उतखनन गावातून सुरू आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी हा संपूर्ण अनधिकृत व बेकायदेशीर प्रकार सुरू आहे, असेही सरपंच यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री कांदळवन बचावचा नारा देत आहेत. आमदार वैभव नाईक कांदळवन राज्य समितीवर आहेत. त्यामुळे रेवंडी येथील प्रकाराकडे त्यांनी गंभीरपणे लक्ष देऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा. कांदळवन तोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. रेवंडी किनाऱ्यावरील कांदळवन व बंधाऱ्यांची तोड तसेच खाडीतील अतिक्रमण याबाबत जिल्हा प्रशासन, महसूल यंत्रणा, वन विभाग, पतन विभाग यांनी तात्काळ कारवाई करावी. अन्यथा अतिक्रमण केलेल्या ठिकाणी खाडीपात्रातच लोकशाही मार्गाने ५ एप्रिल पासून उपोषण छेडण्याचा इशारा रेवंडी सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी दिला आहे.
