ऐतिहासिक स्थळ स्वच्छतेचा निर्णय स्तुत्य;माजी खा नीलेश राणे
मालवण (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला महाराष्ट्र आज आपल्या हातात असून महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्राचे रक्षण कसे करावे, तो कसा चालवावा आणि जनतेला काय द्यावे ही आपली जबाबदारी आहे. या अनुषंगाने शासकीय निधीचा योग्य वापर करून मालवण पंचायत समिती सामाजिक उपक्रम राबवित आहे. पंचायत समितीचा ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छतेचा उपक्रम स्तुत्य असून सामाजिक उपक्रम राबविण्यात मालवण पंचायत समिती अग्रेसर आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्य सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केले. मालवण पंचायत समिती मार्फत तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांची साफसफाई या मोहिमेंतर्गत प्लास्टिक मुक्त सिंधुदुर्ग किल्ला मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. या मोहिमेत पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून किल्ल्यातील प्लास्टिक बॉटल व इतर प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. या दरम्यान शिवराजेश्वर मंदिरात आयोजित कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे हे बोलत होते. यावेळी पंचायत समिती तर्फे पुस्तके देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, आनंद शिरवलकर, पुजारी श्रीराम सकपाळ आदी व तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी प्रास्ताविक गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी केले. सभापती अजिंक्य पाताडे यांनी पंचायत समितीच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. पंचायत समिती मार्फत शासकीय योजना व त्यासाठी येणारा निधी या गोष्टी चालूच असतात. याच योजनांना वेगळा ढंग देऊन निधीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यातूनच तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छतेची मोहीम पंचायत समितीने हाती घेतली आहे. आज ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यात प्लास्टिक कचरा सफसफाईची मोहीम राबविली जात आहे. लवकरच “पंचायत समिती आपल्या दारी” ही योजना राबविण्यात येणार असून याद्वारे गावागावात लोकांना भेटून प्रश्न जाणून घेण्यात येणार आहेत असे पाताडे यांनी सांगितले. यावेळी निलेश राणे म्हणाले, लोकप्रतिनिधी ज्या खुर्चीवर बसतो त्या खुर्चीचे काही देणे लागतो. लोकप्रतिनिधी खुर्चीवर उपकार करत नाही किंवा लोकांवर उपकार करत नाही. खुर्चीवर बसल्यावर लोकप्रतिनिधी समाजपोयोगी किती उपक्रम घेतो याकडे लोकांचा लक्ष असतो. मालवण पंचायत समितीच्या मार्फत सभापती व उपसभापती हे अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. मी स्वतः या कार्यक्रमांना हजर राहिलो आहे. अनेक पंचायत समित्या बघितल्या मात्र सामाजिक उपक्रम राबविणारी मालवण पंचायत समिती अग्रेसर आहे. आज छ्त्रपती शिवाजी महाराजांसाठी जे काही कार्यक्रम होतील त्यात माझा खारीचा वाटा असेल, असेही निलेश राणे म्हणाले. तसेच आज किनारपट्टीवर सीआरझेडचा मोठा बाऊ करण्यात येत आहे. सीआरझेड कधी सुटणारच नाही असे लोकांच्या मनावर बिंबवले गेले आहे. विकासनिधीच्या नावाने आज बोंब आहे. विकास होऊच द्यायचा नाही असे एकूण चित्र आहे असे सांगत निलेश राणे यांनी एका अर्थी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ९ वाजल्यापासून राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत किल्ल्यातील विविध ठिकाणी असलेल्या प्लास्टिक बॉटल, खाद्य पदार्थांची आवरणे व इतर प्लास्टिक कचरा गोळा करून तसेच किल्ल्यातील पायवाटांच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडून साफसफाई केली.
