पावसाळ्यापूर्वी बांदा शहरातील विजेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे…

बाळु सावंत:लवकरच ग्रामपंचायततर्फे महावितरणला निवेदन देणार..

⚡बांदा ता.२८-: बांदा शहरात विजेच्या अनेक समस्या असून पावसाळ्यात शहरात ग्राहकांना याचा मनस्ताप भोगावा लागणार आहे. पावसाळ्याला काहीच दिवस शिल्लक असल्याने शहरातील विजेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे. यासाठी लवकरच ग्रामपंचायततर्फे महावितरणला निवेदन देण्यात येणार असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.

श्री सावंत म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गवरील बांदा हे महत्वाचे शहर आहे. शहरात घरगुती तसेच वाणिज्य ग्राहक हे मोठ्या संख्येने आहेत. एखादेवेळेस वीज बिलांची थकबाकी असल्यास महावितरण तात्काळ कारवाई करते. मात्र विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरण विभाग असमर्थ ठरत आहे. बांदा शहरात विजेच्या अनेक समस्या आहेत.

काही ठिकाणी जीर्ण वीज खांब, जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा असून काही खांबाना तसेच वीज वाहक तारांना झाडांच्या वेलींनी घेरले आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह एखादी घटना घडल्यास याचा परिणाम वीज सेवेवर होणार आहे. त्यामुळेच शहरवासियांना पावसाळ्यात वेळोवेळी विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते.
शहरातील वीज समस्याबाबत महावितरणने तात्काळ उपाययोजना करत या समस्यांचे निराकरण करावे. यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने लवकरच याबाबत लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page