विनायक राऊत यांचे आवाहन ः वागदे येथे मविआची सभा.
कणकवली ः लोकसभा निवडणूक ही संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्वाची आहे. केंद्रातील ब्रह्मराक्षसाचे सरकार पुन्हा आल्यास देशवासीयांचे आयुष्य उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे ब्रह्मराक्षसाचे सरकार देशवासीयांनी उलथवून टाकून इंडिया आघाडीचे सरकार निवडून आणावे. नारायण राणे यांनी गेल्या 35 वर्षांत अनेक मंत्रिपदे भुषवूनही स्वतः चे भले करून जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मशाल ताकदीने प्रज्वलित करण्याचे व कमळ करपवून टाकण्याचा निर्धार केला आहे.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा दारुण पराभव होणार आहे, फक्त होणारा पराभव पचविण्याची ताकद राणेंना मिळू दे, असा टोला महाविकास आघाडीचे उमदेवार तथा खासदार विनायक राऊत यांनी लगावला.
वागदे येथे आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत श्री. राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, उबाठा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विभानसभाप्रमुख सतीश सावंत, सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव, नागेश मोरये, काॅंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, संदीप कदम, प्रतीक पाडावे, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, संजना कोलते, दिव्या साळगावकर, रुपेश आमडोसकर, उत्तम लोके आदी उपस्थित होते.
कणकवली विधानसभेतही मला 20 हजारांचे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1लाखांचे मताधिक्य मिळणार आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. नारायण राणेंनी येथे प्राचारात गुंडांची फौज आणली आहे का, अशी शंका आहे. पण, या गुंडगिरीचा आमदार वैभव नाईक यांनी दहा वर्षांपूर्वी पराभव केला होता. आम्ही लोकांचे आशीर्वाद घेत असतो. माझ्यामुळे कुणाला काहीही त्रास झाला असेल तर जरूर सांगा. मात्र, दुसऱ्या बाजूला टक्केवारीसाठी ठेकेदार, अधिकऱ्यांना मारहाण करणारे ते लोक असून त्यांना जनता स्वीकारणार नाही, असेही राऊत म्हणाले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिले. मात्र, ती आश्वासने ते पूर्ण करू शकले नाहीत. दरवर्षी देशातील 2 कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे मोदींनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात देशातील किती बरोजगारांना रोजगार मिळाला, हे जनतेला ज्ञात आहे. विरोधी पक्षांना संपविणे हा भाजपचा डाव असून जनतेने त्यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. 35 वर्षे नारायण राणे यांनी विविध मंत्रीपदे भूषवली. मंत्रीपदाचा वापर त्यांनी स्वतःच्या विकासासाठी करून जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, असा आरोप नाईक यांनी केला.
गौरीशंकर खोत म्हणाले, विकासाचा नारा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. आज विकास शोधण्याची वेळ आली आहे. वास्तविक नारायण राणेंनी अत्याचार केला ते लोकही आज राणेंसोबत असून यात वागदे गावातीलही आहेत. राणेंनी बाळासाहेबांवर घराणेशाहीचा आरोप केला होता. पण, आज नारायण राणे खासदारकीला उभे, एक मुलगा कणकवलीत आमदार व दुसरा मुलगा पुन्हा विधानसभा निवडणुकीत राहू बघत आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या पराभवाची तर विनायक राऊतांच्या विजयाची हॅटट्रीक करूया, असे आवाहन त्यांनी केले.
सतीश सावंत म्हणाले, 2014 नंतर डिझेल, पेट्रोल, सिमेंट, स्टिल, खते, फवारणी औषधे यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती महागल्या. मोदी सरकारने आमच्या मानेवर जीएसटी बसवून महागाई वाढविली. आमच्या टॅक्समधून ते आम्हाला मदत केल्याचे भासवतात. नीतेश राणेंनी कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये दहा वर्षांमध्ये काय केले? पैसे वाटूनही नारायण राणे 2014 साली पराभूत झाले होते. भाजपला मत म्हणजे थापांना मत आहे.
इर्शाद शेख म्हणाले, मतदान करताना आज चूक केली तर भविष्यात कदाचित मतदान करण्याची संधीही मिळणार नाही. कारण, यापुढे निवडणुका होतील की नाही अशी शंका आहे. देशातील लोकशाही जाऊन हुकूमशाही येऊ शकते, संविधान नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. संविधान बदलण्यासाठीच त्यांच्या 400 पारचा नारा आहे. त्यामुळे यावेळी विचारपूर्वक मतदान करा, असे शेख म्हणाले. यावेळी साक्षी वंजारे, प्रतीक पाडावे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक नीलम पालव यांनी केले. या सभेला मोठ्या संख्येने मविआचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
