योग्य वेळी – योग्य जोखीम हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली…

युवराज लखमराजे खेमसावंत-भोंसले: भोंसले फार्मसी महाविद्यालयातपाचवा पदवीदान समारंभ दिमाखात संपन्न..

⚡सावंतवाडी ता.२२-: एप्रिल २०२४ रोजी यशवंतराव भोंसले फार्मसी महाविद्यालयात पाचवा पदवीदान समारंभ दिमाखात संपन्न झाला. या समारंभात २०१९-२०२३ या तुकडीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या मुंबई विद्यापीठाने दिलेल्या पदव्या समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आल्या, प्रमुख पाहुणे या नात्याने सावंतवाडी संस्थानाचे युवराज श्रीमंत लखमराजे खेम सावंत-भोंसले, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले, बीकेसीचे कार्याध्यक्ष ॲड. सौ. अस्मिता सावंत-भोंसले, बीकेसीच्या अध्यक्षा, सौ. सुनेत्रा फाटक मॅडम बीकेसीच्या प्रशासकीय समन्वयक आणि डॉ. विजय जगताप, प्राचार्य, यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसी हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य डॉ. श्री. विजय जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक व उद्दिष्टे परीक्षा प्रमुख प्रा. नमिता नार्वेकर, यांनी दिली. समारंभाचे स्वागत संबोधन प्राचार्य डॉ विजय जगताप यांनी केले. त्यानंतर पदवीधरांना दीक्षांत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात प्रमुख पाहुणे श्री. युवराज श्रीमंत लखमराजे खेम सावंत-भोंसले यांनी पदवीधारकांना मोलाचे मार्गदर्शन केले, ज्यात त्यांनी सांगितले कि, आयुष्यात यश हे प्रत्येकालाच हवे असते, परंतु यश मिळवण्यासाठी आपणास त्याचप्रकारची जोखीम पत्करावी लागते तरच यश मिळते तसेच प्रत्येकाने पैशापेक्षा माणसाला महत्व देणे गरजेचे आहे जास्तीत जास्त क्षेत्रात कुशल असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने नेहमी नवीन गोष्टी शिकायला हव्यात, संकटाना धैर्याने सामोरे जायला हवे हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा बहुमोल संदेश त्यांनी दिला.

त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. अच्युत सावंत-भोंसले सरांनी सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडावी याबाबत चे मार्गदर्शन केले. फार्मासिस्ट शपथीचे पठण प्राचार्य. डॉ. विजय जगताप सरांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या संकेतानुसार मान्यवरांनी शेला परिधान केला होता. त्यानंतर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मयुरेश रेडकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली. या समारंभाचे सूत्रसंचालन परीक्षा समन्वयक प्रा. प्रणाली जोशी यांनी केले.

या समारंभासाठी बीकेसीचे रजिस्ट्रार प्रसाद महाले, यशवंतराव भोंसले इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे प्राचार्य श्री. डॉ. रमण बाणे, यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ डी फार्मसी चे प्राचार्य श्री. सत्यजित साठे, यशवंतराव भोंसले पॉलीटेकनिकचे प्राचार्य श्री. गजानन भोंसले आदि उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात पाचवा माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले गेले, ज्यात माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून द्वितीय वर्ष फार्मसीच्या मुलांना करिअर बद्दल मार्गदर्शन केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौरव नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page