*💫बांदा दि.२५-:* गोव्यातील कॅसिनोत जुगाराच्या लाखो रुपयांच्या पैशाचा अपहार करून कारने सुसाट वेगात मुंबईच्या दिशेने पलायन करणाऱ्या तिघा युवकांना कॅसिनो चालकाने बांद्यात गाठून बेदम चोप दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. कॅसिनो चालकाने पैसे वसूल करुन पुन्हा गोवा गाठले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील तीन युवक जीवाचे गोवा करण्यासाठी महिन्याभरापूर्वी गोव्यात आले होते. या युवकांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवर एका गावात भाडेतत्वावर खोली घेतली आहे. बुधवारी सकाळीच हे युवक पणजीतील आलिशान कॅसिनो मध्ये खेळण्यासाठी गेले होते. मद्याच्या नशेत या युवकांनी सायंकाळी उशिरा कॅसिनो मधील लाखो रुपये हडप करून आपल्या कारने बांद्याच्या दिशेने पलायन केले. कॅसिनो मधील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तिघे संशयित युवक कैद झाल्याने कॅसिनो मालकाने आपल्या सहकाऱ्यांसह तिघा युवकांचा पाठलाग केला. सुसाट वेगात पळून जाणाऱ्या या युवकांच्या कारचा बांद्यात अपघात झाला. अपघातात कारचे पुढील दोन व मागील एक टायर फुटल्याने युवक अडकून पडले व कॅसिनो मालकाच्या जाळ्यात आयतेच अडकले. याठिकाणी जोरदार बाचाबाची झाली. कॅसिनो मालकाने तिघा युवकांना बेदम चोप दिला. युवकांनी हडप केलेले पैसे परत घेत त्याने गोवा गाठले. आज शहरात या प्रकरणाची चर्चा बांदा शहरात सुरू होती.
कॅसिनोत पैशाचा अपहार करून पलायन करणाऱ्या युवकांना कॅसिनो चालकाकडून बांद्यात चोप…
