आचरा रामेश्वर मंदिरात ऐतिहासिक रामजन्म सोहळा पार…

मालवण दि प्रतिनिधी

शिवकालीन परंपरेचा वारसा जोपासत मुखी रामनामाचा जप करीत आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत कसबा आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा ऐतिहासिक राम जन्मोत्सव संपन्न झाला. गुढीपाडव्यापासून येथील रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवनिमित्त रामेश्वर मंदिराचा
सभामंडप आकर्षक फुलांनी तसेच मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राघूविराच्या आरतीची फेरी सुरु झाली. मंदिराला नऊ फेऱ्या मारून पूर्ण झाल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास ह.भ.प. मिलिंद बुवा कुळकर्णी यांनी राम जन्मोत्सवाच्या उत्सवाला सुरुवात केली. शाही थाटात या सोहळ्यास प्रारंभ झाला. आपल्या सुमधुर गीतांनी कुळकर्णी बुवांनी राम जन्माची कथा उपस्थितांना उलगडून सांगितली. अन दुपारी साडेबाराच्या सुमारास मंदिरातील राम जन्मोत्सवानिमित्त ठेवलेली घटिका भरल्यानंतर राम जन्माचा सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

संस्थांनी शाही थाटात साजरा होणारा हा सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. या उत्सवासाठी आचरा पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.

You cannot copy content of this page