प्रतिभा डेअरीकडे २ कोटी ६० लाख शेतकऱ्यांचे अडकले:परशुराम उपरकर
*💫कणकवली दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून घोडेबाजार केला जात असल्याचा एकमेकांवर आरोप केला. त्यात सतीश सावंत यांनी आ. नितेश राणे यांच्यावर तर आ.नितेश राणे यांनी सतीश सावंत हे घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला.त्यामुळे राणे- सावंतांनी आणि पहिल्यांदा जिल्ह्यातील दूध शेतकरी व गुंतवणूकदारांना पैसे मिळवून द्यावेत.केवळ निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यांवर चर्चा घडून जनतेची दिशाभूल करू नये,असा टोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी लगावला आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री ,संतोष सावंत उपस्थित होते. हे फोडाफोडीचे राजकारण करताहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाला प्रतिभा दूध डेअरी आणणारे हे आरोप प्रत्यारोप करणारे दोघेही होते.तेच आरोप प्रत्यारोप करत मी तो नव्हेच…असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.गोकुळ डेअरीला बाजूला करुन नव्याने प्रतिभा डेअरी आणण्यास हे राणे -सावंत एकत्र होते.जिल्हा परिषद अध्यक्ष व बँक अध्यक्ष ही पदे सतीश सावंत यांना राणे यांनीच दिली. मांडीला मांडी लावून तेव्हा बसत होते .तेव्हा राणेंना सतीश सावंत चांगले होते,असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला. दोघेही एकत्र येऊन सर्वसामान्य लोकांचे पैसे द्या,तसेच दुधाचे शेतकऱ्यांना पैसे द्यावेत.जि. प. अध्यक्ष कोण झाला तरी जनतेला सुख दुःख नाही.यापूर्वी जिल्हा बँक अध्यक्ष यांनी प्रतिभा डेअरीबाबत बैठका लावत पैसे देत असल्याचे सांगितले.पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले.दूध संघ जिवंत करुन पैसे देण्याची हमी देत होते.प्रतिभा डेअरीकडे २ कोटी ६० लाख व व्याज अडकले आहे,ती रक्कम दोन्ही नेत्यांनी मिळवून द्यावी.महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघांना विनंती करते, आमदारांनी दुधाचे शेतकऱ्यांना पैसे द्यावेत.तर सतीश सावंत यांनी गुंतवणूकदार यांचे पैसे देऊन सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून द्यावा,असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.
