सत्यशोधक शिक्षक सभेची जि प मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी..
⚡कणकवली ता.२८-:
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सद्यस्थितीला सुरु आहे, याद्वारे राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामधील २१६७८ जागापैकी ११०८५ उमेदवारांची नियुक्ती जाहिर करण्यात आलेली आहे. त्यांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुद्धा जिल्हावार सुरु केलेली होती. काही ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण झाली तर काही ठिकाणी ही प्रक्रिया अलिकडेच लागलेल्या लोकसभेच्या आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आलेली आहे. मात्र शिक्षक भरतीची उर्वरित प्रक्रिया निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन सुरू करावीत अशी मागणी सत्यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्ग यांनी जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक भरतीची ही प्रक्रिया सुमोंटो याचिकेद्वारे कोर्टाच्या निर्देशानुसार दिलेल्या रोड मॅप नुसार सुरु होती. प्रदीर्घ अशा प्रतिक्षेनंतर डी.एड्., बी.एड्. अभियोग्यताधारकांचा आयुष्यात आनंदाचा क्षण आलेला होता. तीस हजार पदांची भरती जाहिर करणाऱ्या शासनाने फक्त २१६७८ जागांची जाहिरात काढली आणि ११०८५ अभियोग्यताधारकांची नियुक्ती यादी जाहिर केली. पहिल्या टप्पामधील ११०८५ उमेदवारांची नियुक्ती यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरीत जागांच्या नियुक्तीसाठी उमेदवार प्रतिक्षेत आहेत. अगदी २ ते ३ गुणांनी नियुक्तीपासून वंचित राहिलेले अभियोग्यताधारक नैराश्यग्रस्त अवस्थेत आहेत. १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अजुनही या अभियोग्यताधारकांच्या वाट्याला निराशाच आहे. २१६७८ पदांकरिता जाहिरात दिलेला कालावधी हा आचारसंहितेच्या पूर्वीचा आहे. त्यामुळे उर्वरीत जागांकरिता प्रतिक्षेत असणाऱ्या अभियोग्यताधारकांना न्याय देण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन आचारसंहितेमध्ये सुद्धा शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया सुरु करण्याची मागणी शिक्षण आयुक्त पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच अलिकडेच आचारसंहितेपूर्वी १५ मार्च च्या शासन निर्णयानुसार नवीन संचमान्यता निकष आले आहेत. त्यामुळे एक शिक्षकी शाळांचे प्रमाण वाढणार आहे व कार्यरत असलेलेच शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन पदे कशी निर्माण होणार ही भविष्यकाळातील धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने विशेष परवानगी दिल्यास विदाऊट इंटरव्यू तसेच विथ इंटरव्यू राउंडची प्रतिक्षा करत असलेल्या अभियोग्यताधारकांना दिलासा मिळणार आहे. असे म्हटले आहे.
