⚡बांदा ता.१३-: येथील गोगटे-वाळके महाविद्यालयात भौतिक सुविधातंर्गत खासदार संजय राऊत यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विस्तारित वर्ग खोल्यांचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे चेअरमन डी. बी. वारंग, शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक बाळा गावडे, संस्थेचे सचिव एस. आर. सावंत, खजिनदार तुकाराम शेटकर, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, शिवसेना (उबाठा) सावंतवाडी तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ आदिसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना या महाविद्यालयाला वर्गखोल्यांची गरज होती. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष श्री वारंग यांनी आपल्याशी चर्चा केली होती. खासदार श्री राऊत यांच्या खासदार निधीतून निधी उपलब्ध करून ही मागणी पूर्ण करण्यात आली. यापुढे या महाविद्यालयाच्या भौतिक सुविधासाठी आपण निश्चितच सहकार्य करू असे आश्वासन खासदार श्री राऊत यांनी दिले. अध्यक्ष स्थानावरुन बोलताना डी. बी वारंग यांनी महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणत्या समस्या आजपर्यंत आल्या आणि यासाठी ब-याच दात्यांनी मदत केली यामुळेच आज हे महाविद्यालय मानांकन प्राप्त आहे. तसेच खासदार विनायक राऊत यांच्या बद्दल बोलताना म्हणाले की बोले तैसा चाले त्यांची वंदावे पाऊले असे सांगत त्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. एन. डी. कारवेकर यांनी केले तर आभार श्री वालावलकर यांनी मानले. सदर कार्यक्रमास बांदा ग्रा. पं सदस्य साईप्रसाद काणेकर, शिवसेना उबाठा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, ज्ञानेश्वर येडवे, सामाजिक कार्यकर्ते संजय आईर, विवेक गवस, अशोक परब, श्री. परब, महाविद्यालयाचे हितचिंतक, आजी- माजी विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातील व बांदा ग्रामस्थ व परिसरातील पालक उपस्थित होते.
