‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची परस्पर विरोधी मागणी : एकमेकांवर कुरघोडी करण्याचा डाव
*💫कणकवली दि२०-:* जमावबंदी आदेशभंग प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवासेनाप्रमुख गीतेश कडू, नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केल्यानंतर भाजपाने पुढची चाल खेळत खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस भगवती मंगल कार्यालयात साजरा केल्याबद्दल थेट पालकमंत्री, खासदार, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षद गावडे, संदेश पटेल, रवींद्र जोगल, संजय पारकर, गीतेश कडू यांच्यासह वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या जिल्ह्यातील शिवसैनिकांवर जमावबंदी भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कणकवली पोलिसांकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या रात्रीच्या संचारबंदी च्या आदेशाला झुगारून पटवर्धन चौकात 15 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजता खासदार राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याबद्दल कन्हैया पारकर, सुजित जाधव, वैभव मालंडकर आदी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी केली आहे. शिवसेना भाजपाचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा हा डाव आता भविष्यात कोणते वळण घेतो ? शांत कणकवली पुन्हा अशांत होण्याचे हे निमित्त तर होणार नाही ना ? अशी चर्चा कणकवलीत नाक्यानाक्यावर सुरू आहे.
